चितळी- पाडळीच्या तिन भुरट्या चोराकडून ९ मोटार सायकली जप्त,पाथर्डी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण जिल्हाभर मोटार सायकल चोरांच्या उचापती सुरू असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चितळी- पाडळीच्या तिन भुरट्या चोराकडून एक टीव्हीएस आणि आठ स्प्लेंडर अशा एकूण ९ मोटार सायकली पाथर्डी पोलिसांनी जप्त करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.पाथर्डी न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.पाथर्डी पोलीसांच्या या धडाकेबाज कामगिरी मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या बाबतची माहिती अशी की दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री महेश भगवान खोर्दे राहणार हंडाळवाडी, तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर यांची टीव्हीएस स्टार सीटी कंपनीची मोटार सायकल चोरीला गेली होती. या संदर्भात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पाथर्डी पोलिसांनी तालुक्यातील अनेक गावांत भटकंती करीत सदर चोरीला गेलेल्या गाडीचा शोध घेतला असता त्यांना सदर मोटार सायकल ही संशयित आरोपी नंबर १) अश्पाक इसाक पठाण वय वर्षे (३०) आणि २) गणेश राजेंद्र साळुंके वय वर्षे (२५) दोघेही राहणार पाडळी,तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर, यांनी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.सदर आरोपींना अटक करून घडलेल्या गुन्ह्याचा तपास करून त्यांच्या कडून फिर्यादीची चोरीस गेलेली मोटार सायकल जप्त केली गेली आहे.सदर दोन्ही संशयित आरोपीकडे सखोल चौकशी दरम्यान तपास केला असता त्यांनी अजूनही ८ स्प्लेंडर मोटार सायकली चोरी केल्याची पोलीसांना कबुली दिली आहे.त्यांनी चोरी केलेल्या सर्व मोटार सायकली एक इसम नामे मच्छिंद्र भानुदास शिंदे वय वर्षे (३१) राहणार चितळी , तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर,यास विक्री साठी दिल्या असल्याचे सांगितल्याने संशयित आरोपी नामे मच्छिंद्र भानुदास शिंदे यास चितळी येथुन ताब्यात घेऊन त्यास सदर गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून चोरीच्या ८ स्प्लेंडर मोटार सायकली जप्त केल्या आहेत.अटक केलेल्या आरोपींना पाथर्डी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे हे करीत आहेत.वरील अटक केलेल्या तिन आरोपी कडून एकूण ४ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या एकूण ९ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.त्यामध्ये १ टीव्हीएस स्टार सीटी आणि ८ हीरो+होंडा स्प्लेंडर अशा एकूण ९ मोटार सायकलींचा समावेश आहे. सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब आणि शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू साहेब,पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या मार्गदर्शना खालील पोलिस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर ईलग, पोलिस कॉन्स्टेबल इजाज सय्यद, पोलिस कॉन्स्टेबल सागर बुधवंत, पोलिस कॉन्स्टेबल संजय जाधव, धनराज चाळक यांच्या पथकाने केली आहे. पाथर्डी तालुक्यातील अजूनही अनेक गावांत भुरट्या चोराकडून अनेक प्रकारच्या चोऱ्या होत आहेत.स्वत:ला गावातील डॉन म्हणून घेणारे सदर भामटे हे राजरोसपणे गावात फिरत आहेत त्यांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.त्यांनी केलेले अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.त्यामुळे पोलीस खाते आता सतर्क झाले असून अनेक गावांतील डॉन यांची गणना सुरू झाली आहे. भविष्यात अनेक भुरटे गुन्हेगार हे पोलीसांच्या गळाला लागले जाण्याची चिन्हे दिसत आहेत. चोरीला गेलेल्या स्प्लेंडर मोटार सायकल मालकांनी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या चोरीला गेलेल्या गाडीचा चेशीनंबर तर नाही ना याची खात्री करावी.सदर चोरीच्या गुन्ह्यात सापडलेल्या मोटार सायकल गाड्या या पाथर्डी तालुक्यातीलच असण्याची दाट शक्यता आहे.