सोयगाव तालुक्यात बीएसएनएल सेवा ठप्प; नागरिकांचा संताप, कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा
दत्तात्रय काटोले
सोयगाव : शहरासह संपूर्ण सोयगाव तालुक्यात मागील तीन दिवसांपासून बीएसएनएलची दूरध्वनी व इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद असून याचा गंभीर परिणाम शासकीय कार्यालये, बँका व नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर झाला आहे. तहसील कार्यालयासह राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बीएसएनएलची सेवा बंद असल्यामुळे ऑनलाईन प्रणालीवर आधारित महसूल, बँकिंग व्यवहार, विविध प्रमाणपत्रे तसेच इतर शासकीय कामे पूर्णपणे रखडली आहेत. याचा फटका शेतकरी, विद्यार्थी व सामान्य नागरिकांना बसत असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
विशेष म्हणजे, सोयगाव येथे बीएसएनएलचा कोणताही जबाबदार अधिकारी नियमितपणे उपस्थित नसल्याने तक्रारींची तात्काळ दखल घेतली जात नाही. तालुक्यातील बीएसएनएल कार्यालयाचे कामकाज छत्रपती संभाजीनगर येथूनच चालविले जात असल्याने स्थानिक पातळीवर सेवा बिघाड झाल्यास नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वारंवार तक्रारी करूनही बीएसएनएल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना तीव्र होत आहे. तात्काळ बीएसएनएलची सेवा सुरळीत करण्यात यावी तसेच सोयगाव येथे जबाबदार अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा संतप्त नागरिक व ग्राहक बीएसएनएल कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देत आहेत.
फोटो दत्तात्रय काटोले

























