पाचोरा येथे “भारतीय समाजाच्या निर्मिती आणि विकासात सुफी संतांचे योगदान” या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन
पाचोरा शहरातील मरकजी मशीद नूर मशीद येथे “भारतीय समाजाच्या निर्मिती आणि विकासात सुफी संतांचे योगदान” या शीर्षकाखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराणच्या पठणाने झाली. कार्यक्रमाची ओळख शेख जावेद रहीम यांनी करून दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भूषवले.
प्रमुख पाहुण्यांमध्ये पाचोरा तालुक्याचे तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक राहुल पवार, मौलाना जीशान रजा, मौलाना नईम रजा ,आणि माजी नगराध्यक्ष संजय गोयल यांचा समावेश होता.
जीशान रजा यांनी आपल्या भाषणात शेख अब्दुल कादिर जिलानी (रहम.तुल्लाह) आणि शेख मोईनुद्दीन चिश्ती (रहम.तुल्लाह) यांच्या जीवनावर प्रकाश टाकत, सुफी संतांनी मानवतेसाठी केलेल्या सेवा, तसेच रंग, वंश, जातपात, उच्च-नीच या भेदभावाच्या पलीकडे जाऊन गरीब आणि गरजू लोकांसाठी आधार बनण्याच्या त्यांच्या कार्यावर जोर दिला. जीशान रजा साहेबांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अल्लामा फजल-ए-हक खैराबादी यांच्या इंग्रजांविरुद्धच्या पहिल्या फतव्यापासून ते सुफी संत आणि विद्वानांच्या बलिदानापर्यंत प्रकाश टाकला.
मौलाना नईम रजा साहेबांनी सध्याच्या काळात सोशल मीडियाद्वारे पसरवल्या जाणाऱ्या धार्मिक द्वेषाचा उल्लेख केला आणि स्थानिक एकता कायम राखण्यासाठी सुफी संतांच्या शिकवणींचा प्रचार करून त्या शिकवणींना आपल्या दैनंदिन जीवनात आणण्याचे आवाहन केले. त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या परिसरात शांतता आणि बंधुता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांची खूप प्रशंसा केली.
विजय ठाकूर यांनी सांगितले की सुफी संतांनी कोणत्याही धर्म किंवा जातीचा भेद न करता मानवतेची सेवा केली. याच कारणामुळे शतके उलटूनही, ‘ग्यारहवीं शरीफ’, ‘छठी शरीफ’ आणि ‘उर्स’ च्या वेळी त्यांची आठवण करून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या या सेवांमुळेच हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती सर्व धर्माचे अनुयायी श्रद्धेने त्यांच्या दरबारात हजेरी लावतात. त्यांच्या कल्याणकारी कार्यामुळेच हे लोक आजही आपल्या हृदयावर राज्य करतात.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या कार्यक्रमाची खूप प्रशंसा केली आणि प्रत्येक महिन्यात आपापल्या परिसरात अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यावर जोर दिला. अशा कार्यक्रमांच्या आयोजनामुळे परस्पर संबंध मजबूत होतील, एकमेकांच्या रीतीरिवाज समजून घेता येतील आणि देशात शांतता व सुव्यवस्था कायम राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी उपस्थित श्रोत्यांना आपापल्या भागात आपसातील बंधुता कायम राखण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन शेख जावेद रहीम यांनी केले. सामूहिक प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नूर मशीद पंच कमिटीचे अध्यक्ष महमूद खान, सचिव अब्दुल वहाब बागबान, उपाध्यक्ष जहांगीर पिंजारी, जाकीर खाटीक, सलाम इब्राहिम, फिरोज खान, अफजल मनियार, शरीफ रंगरेज, उस्मान खाटक, जकी खाटीक, सलीम मनियार, रहमान तडवी, मौलाना परवेज रजा ,मौलाना अकरम रजा,मौलाना ताहिर रजा साहेब, यशराज साहेब यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला स्थानिक आणि आसपासच्या भागातून आलेल्या नागरिकांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.