पाचोऱ्यात निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा तायक्वांदोत झेंडा फडकला “सर्वम परदेशी” विभागीय विजेता ठरला
पाचोरा :
“मेहनत, जिद्द आणि चिकाटी” यांची सांगड घालून निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा क्रीडांगणावर आपली ताकद दाखवून दिली आहे. नुकत्याच जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या नाशिक विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत या शाळेच्या इ. 7 वी तील सर्वम संजय परदेशी या लहानग्या पण दमदार खेळाडूने आपल्या अप्रतिम खेळकौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत 38 ते 41 किलो वजनी गटात प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले.
सर्वमच्या या उल्लेखनीय यशामुळे आता तो नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करत राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आपला दम दाखवणार आहे. ही कामगिरी केवळ शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण पाचोरा तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मा. वैशालीताई सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी श्री. आय. बी. सिंग, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील तसेच प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील यांनी सर्वमचे मन:पूर्वक अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या विजयानंतर शाळेत आनंदाचे वातावरण असून, क्रीडा शिक्षक श्री. गणेश मोरे, श्री. नंदू पाटील, श्री. प्रवीण मोरे व श्री.सोमनाथ माळी यांच्या समर्पित प्रशिक्षणामुळेच हा पराक्रम शक्य झाल्याचे सर्वांनी नमूद केले.
क्रीडा क्षेत्रात पाय रोवणाऱ्या नवोदित खेळाडूंसाठी सर्वम संजय परदेशी प्रेरणादायी ठरत असून, त्याच्या या यशाने इतर खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे.