रुद्रेश्वर लेणीतील धबधब्याचा भाग कोसळला; मुसळधार पावसाचा फटका
गलवाडा वाडी, सोयगाव (प्रतिनिधी) – सोयगाव तालुक्यातील गलवाडा वाडी शिवारामधील ऐतिहासिक आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रुद्रेश्वर लेणी परिसरात आज रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठा अनुचित प्रकार घडला आहे. लेणीमधून वाहणाऱ्या धबधब्याचा काही भाग कोसळून थेट खालील कुंडामध्ये पडल्याची माहिती समोर आली आहे.
या धक्कादायक घटनेमुळे लेणी परिसरातील नैसर्गिक सौंदर्याला काहीसा धक्का बसला असून, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, परिसरात सुरक्षा कारणास्तव काही काळ बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. भू-गर्भ तज्ज्ञांच्या मदतीने या घटनेच्या मूळ कारणांची चौकशी करण्यात येणार आहे.
रुद्रेश्वर लेणी ही या भागातील एक महत्वाची पर्यटनस्थळ असून, नैसर्गिक धबधबा आणि प्राचीन लेण्यांमुळे वर्षभर पर्यटक येथे भेट देतात. परंतु, दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा जोर वाढत असल्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासनाने नागरिकांनी आणि पर्यटकांनी लेणी परिसरात खबरदारीने वावरण्याचे आवाहन केले आहे.