गुरूवंदना प्रेरणोत्सवाने उजळली श्री गो.से. हायस्कूलची परंपरा

गुरूवंदना प्रेरणोत्सवाने उजळली श्री गो.से. हायस्कूलची परंपरा

 

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो. से. हायस्कूल, पाचोरा या शाळेत वर्षभर विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन होत असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेत शाळेचे मुख्याध्यापक एन आर ठाकरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा हे पावन पर्व यंदाही प्रेरणादायी आणि संस्कारक्षम वातावरणात साजरे करण्यात आले.

सण, उत्सव आणि विविध उपक्रमांचे माध्यम करून शाळा विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण रुजवते आणि त्यातून एक जबाबदार, सुसंस्कारित पिढी घडवण्याचा प्रयत्न सातत्याने करते. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील गुरू-शिष्य परंपरेचा अत्यंत पवित्र दिवस. या दिवशी ज्ञानदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. त्या अनुशंगाने श्री गो.से. हायस्कूलमध्ये एक आकर्षक आणि आशयघन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षिका ए. आर. गोहील या होत्या. त्यांनी आपल्या भाषणातून गुरुंचे विद्यार्थ्यांच्या जीवनात असलेले स्थान, त्यांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व आणि शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या घडणीत होणारा मौल्यवान सहभाग यावर सखोल प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पर्यवेक्षक रहीम तडवी सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख बोरसे सर, ज्येष्ठ शिक्षक पी. एम. पाटील तसेच अरुण कुमावत हे मान्यवर शिक्षक उपस्थित होते. या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धन करत त्यांच्याकडून होत असलेल्या सर्जनशील उपक्रमांची प्रशंसा केली. विशेषतः विद्यार्थ्यांनी घेतलेले पुढाकार आणि आयोजन कौशल्य यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमात एक वेगळेपण ठळकपणे जाणवले ते म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन पाचवी ‘क’ वर्गातील विद्यार्थ्यांकडे सोपविण्यात आले होते. शाळेने विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवून त्यांना संधी दिली आणि त्या संधीचे सोनं करत विद्यार्थ्यांनी अतिशय नेटके, शिस्तबद्ध आणि रचनात्मक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

विद्यार्थ्यांनी फलक आणि वर्गसजावट यात अतिशय कल्पकतेने काम केले. शाळेच्या भिंतींवर विविध गुरूवंदना, सुविचार, रंगीत फलक आणि हस्तकला वस्तूंनी सजावट करण्यात आली होती. शाळेच्या संपूर्ण परिसराला एक भक्तिभावपूर्ण आणि सुसंस्कारित साज चढवण्यात आला होता. गुरूंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी गुरूंच्या पायावर पुष्प अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भाषणांचे सादरीकरण झाले. एकूण पाच ते सहा विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांत गुरूंचे महत्त्व आणि त्यांच्या जीवनातील अनुभव मांडले. यातील अनेक भाषणे अर्थपूर्ण, भावनिक आणि मनाला भिडणारी होती. त्यात बिल्दी (ता. पाचोरा) येथील पाचवी ‘क’ चे विद्यार्थी समर्थ भूषण धनगर यांचे मनोगत विशेषत्वाने उल्लेखनीय ठरले. समर्थने आपल्या भाषणात आपल्या जीवनात आलेल्या शिक्षकांच्या प्रभावाची कथा सादर केली. त्यांनी शिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, समजावून सांगितलेली शिकवण, आणि कठीण प्रसंगी दिलेला आधार याचे वर्णन अतिशय भावनिक आणि प्रभावी भाषेत केले. त्याच्या भाषणाने उपस्थित सर्व शिक्षक भारावून गेले. त्याच्या भाषणातील काही ओळी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या ठरल्या. जसे की — “आई वडिल जन्म देतात पण गुरू जीवन घडवतो… आई-वडिलांनी आपले जीवन सुरू केलं पण गुरूने त्याला दिशा दिली.” अशा ओळींच्या माध्यमातून त्याने गुरूच्या अस्तित्वाचे असामान्य महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात काही विद्यार्थ्यांनी गुरूवंदना गीत, श्लोकपठण सादर केले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभाग, आत्मीयता, शिस्त, वेळेचं व्यवस्थापन आणि टीमवर्क यामुळे सर्व शिक्षक भारावून गेले.

या उपक्रमामुळे केवळ गुरुपौर्णिमा साजरी झाली नाही तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, जबाबदारीची भावना, आणि टीमवर्क यांचा विकास झाला. एकंदरीत, शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नातं दृढ करणारा, परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा आणि संस्कृतीची ओळख पटवणारा कार्यक्रम ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाचवी ‘क’ वर्गातीलच दोन विद्यार्थ्यांनी समर्थपणे केले. त्यांनी आपल्या छोट्याशा वयात देखील सहजता, शुद्ध उच्चार आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सूत्रसंचालनात प्रगल्भता दर्शवली.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख बोरसे सर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत शिक्षकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पर्यवेक्षक रहीम तडवी सर यांनी विद्यार्थ्यांना उदात्त उद्दिष्ट ठेवण्याचे आणि शिक्षणासोबत सांस्कृतिक व सामाजिक जाणिवा ठेवण्याचे आवाहन केले.

श्री गो.से. हायस्कूलच्या या उपक्रमातून दिसून आले की, शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून ते जीवनातील मूल्यांची शिकवण आहे. शाळेने विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागाची संधी देत ‘गुरुपौर्णिमा’चा कार्यक्रम एक प्रेरणादायी पर्वणी ठरवली. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी घडतात, विचार पक्के होतात, आणि मूल्यांची बीजे खोलवर रोवली जातात हे निश्चित. पाचवी ‘क’ वर्गाच्या या उपक्रमाचे संपूर्ण शाळेत उदाहरण म्हणून उल्लेख होत असून, यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही अशा संधींसाठी उत्साह आणि प्रेरणा वाढली आहे.

शेवटी हेच म्हणावेसे वाटते की –

“गुरु म्हणजे केवळ शिकवणारे नव्हे, तर घडवणारे असतात… आणि अशा गुरुंसाठी कृतज्ञतेचे शब्द अपुरेच असतात!”