हिरवळीचे खते धैंचा वापर करुन जमिनीचा पोत सुधारण्याचे कृषि विभागाचे आवाहन

हिरवळीचे खते धैंचा वापर करुन
जमिनीचा पोत सुधारण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव, दि. 2 – भारतीय बिज निगम, जळगाव यांच्याकडे धैंचा बियाणे (प्रति किलो रु. 67) व सन बियाने (प्रति किलो रु. 75) उपलब्ध असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन अनिल भोकरे, कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
धैंचा हलक्या, मध्यम भारी आणि क्षारयुक्त जमिनीतही वाढतो. धैंचाचे वाढीवर कमी ओल अधिक ओलीचा फारसा वाईट परिणाम होत नाही. धैंचाची वाढ थंड, उष्ण व दमट हवामानात जवळपास सारखीच होत असल्याने वर्षभर केव्हाही आणि कोणत्याही पिकाअगोदर हिरवळीचे खत धैंचा घेता येते.
धैंचापासून प्रति एकर 80 क्विंटल हिरवळीचे खत मिळते, जे एकरी 224 क्विंटल शेणखत एवढा फायदा देते. धैंचा कुजत असताना सुक्ष्म जीवाणूच्या निर्मितीस चालना मिळून त्यापासून पोषक सेंद्रीय पदार्थाची निर्मिती होते, पर्यायाने जमिनीची प्रत सुधारते. धैंचामुळे जमिनीतील न विरघळणाऱ्या क्षारांचे प्रमाण घटते व तीचा सामु (पी.एच) सुधारतो. धैचास भरपुर मुळे येतात व ती दूरवर व खोलवर पसरतात त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन पुढील पिकांचे मुळाभोवती हवा खेळती राहण्यास मदत होते. धैचा लागवडीपासून 45-50 दिवसानंतर लाकडी, किंवा लोंखडी नांगरच्या सहाय्याने जमिनीत गाडावे. 10-15 दिवसानंतर वखराच्या (कुळवाच्या) आडव्या उभ्या पाळ्या देऊन सर्व जमिनीत चांगले मिसळावे. केळी पीकात अंतरपीक म्हणुन लागवड करुन केळीस हिरवळीचे खत उपलब्ध करुन देता येऊ शकते. अधिक माहिती साठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. असेही श्री. भोकरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.