राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान जिल्हाधिकारी प्रवीण महाजन,मुख्याधिकारी विकास नवाळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान
जिल्हाधिकारी प्रवीण महाजन,मुख्याधिकारी विकास नवाळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित

 

 

जळगाव, दि. 21  – राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात सर्वोत्कृष्ट उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव ने संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घरपोच वाटप करुन ‘पेन्शन आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, संजय गांधी निराधार योजनेचे तहसलिदार जितेंद्र कुंवर यांना तर बचतगटांना फळझाड प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन दिल्याबद्दल एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांना सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मानित केले.
नागरी सेवा दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे आज झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. महाजन यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते 10 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ तर श्री. नवाळे यांना 50 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक आदि यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरीता तसेच सर्वाच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरीता राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा 2022-23 राबविण्यात आली. या स्पर्धेत विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावात जिल्हाधिकारी जळगाव यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घरपोच वाटप करुन राज्यात प्रथम क्रमांक मिळविला तर बचतगटांना फळझाड प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन दिल्याबद्दल एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. नवाळे यांनी सर्वोत्कृष्ट अधिकारी गटात प्रथम क्रमांक मिळविला.