अन्यथा शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यलया समोर आंदोलन करेल-अमोल शिंदे

पाचोरा व भडगाव तालुक्यातील पीकविमा धारक शेतकऱ्यांना २५% आगाऊ रक्कम नुकसान भरपाई स्वरूपात द्या

———————————————————
अन्यथा शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यलया समोर आंदोलन करेल-अमोल शिंदे

सध्या खरीप हंगाम सुरू असून मागील महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे.यामध्ये प्रामुख्याने पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक कापूस,उडीद, मूग,सोयाबीन, ज्वारी,बाजरी,मका इ. पिकांची वाढ खुंटली असून पिके पूर्णपणे पिके करपली आहेत.शेतकऱ्यांचा पूर्ण हंगाम हातून निघून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे या माध्यमातून झालेले आहे. असे भाजपा तालुका अध्यक्ष व विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तसेच व्हिडिओ चित्रफितीमध्ये म्हटले आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या माहिती नुसार पाचोरा तालुक्यात साधारणता ४४५०० शेतकऱ्यांनी व भडगाव तालुक्यातील २५००० शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा काढलेला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या दि.२६ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील विविध निकषा व तरतुद नुसार शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिलं जातं. यापैकी एक तरतूद (अ.क्र.१०.२) म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारं पिकांचं नुकसान. या तरतुदी अंतर्गत, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती ( Mid Season Adversity) म्हणजे पूर, पावसातील खंड, दुष्काळ यामुळे पिकांचं नुकसान झालं असेल आणि उत्पादन घटणार असेल,तर नुकसान भरपाई दिली जाते. यामध्ये,अपेक्षित विमा नुकसान भरपाईच्या २५ % मर्यादे पर्यंतची रक्कम आगाऊ स्वरुपात दिली जाते.तरी तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी अमोल शिंदे यांनी केली आहे. यापूर्वी देखील याच मागणीसह त्यांनी पाचोरा-भडगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या आशयाचे निवेदन पाचोरा प्रांताधिकारी यांना दि.३१ ऑगस्ट २०२३ रोजी दिले होते.
पाचोरा व भडगाव तालुक्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात पाऊस पुर्णपणे खंडित झाला असून खरीप हंगामातील पिके पूर्ण करपली आहेत. सदरील प्रतिकूल हवामान परिस्थिती अधिसूचना निर्गमित करण्याचे अधिकार हे मा.जिल्हाधिकारी व मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना असून हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना आजपर्यंत निर्गमित केलेली नाही.
सदरील पावसाचा अहवाल पडताळणी केले असता पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळ या निकषाप्रमाणे पात्र ठरणार असून प्रशासनाने तात्काळ अधिसूचना निर्गमित करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत विमा कंपनीस सूचित करावे अन्यथा पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असून तात्काळ जिल्हा प्रशासन व कृषी विभाग यांनी सदरील अधिसूचना निर्गमित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे अमोल शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकात व व्हिडीओ मध्ये म्हटले आहे.