पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द गावचा सुपुत्र राजेंद्र मधुकर पाटील यांना विभागीय सहाय्यक आयुक्त पदी निवड

पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द गावचा सुपुत्र राजेंद्र मधुकर पाटील यांना विभागीय सहाय्यक आयुक्त पदी निवड

 

पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द गावचा सुपुत्र राजेंद्र मधुकर पाटील यांना विभागीय सहाय्यक आयुक्त पदी बढती मिळाली असून त्यांची नाशिक विभागात साठी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे तारखेडा गावासह तालुक्यात आनंद व्यक्त होत आहे.
तारखेडा खुर्द सारख्या लहानशा, शेती व्यवसायाशी निगडित असलेल्या गावातील राजेंद्र मधुकर पाटील यांनी 2000 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय सेवेत प्रवेश केला .त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक तर आई गृहिणी. घरातील प्रशासकीय सेवेचा कोणताही वारसा नसताना केवळ स्वकर्तृत्वावर त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवला. एरंडोल, मुक्ताईनगर , पाचोरा, पनवेल, पालघर येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्यांना बढती मिळाली. गेल्या चार वर्षांपासून ते नंदुरबार जि प मध्ये कार्यरत होते . आतापर्यंतच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी बालकांचे कुपोषण, निर्मल ग्राम अभियान, संत गाडगेबाबा अभियान, प्राथमिक शाळांचा शैक्षणिक स्तर सुधारणे, विमानतळ बाधित गावांमधील रहिवाशांना न्याय मिळवून देणे, माता व बालमृत्यू रोखणे, मजुरांचे स्थलांतर थांबवण्यासाठी गोधडी शिवण प्रशिक्षण देऊन व गोधडी शिवून कुपोषित बालकांच्या पालकांना एनजीओ मार्फत वाटप करणे, सरपंचांचे प्रशिक्षण, ग्रामपंचायत इमारती, स्मशानभूमी ,शाळांना संरक्षक भिंत आदि महत्वपूर्ण बांधकामे प्राधान्याने पुर्ण करणे अशी महत्त्वपूर्ण कामे करून आपला एक वेगळा ठसा प्रशासकीय सेवेत उमटवला. त्यांच्या या कामाची दखल घेऊन विभागीय सह आयुक्त म्हणून त्यांना बढती देण्यात आली असून नाशिक विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा राजेंद्र चिंचोले, प्रा सी एन चौधरी, ध्येय अकादमीचे संस्थापक संदीप महाजन,प्रदीप चौधरी, सुनील वाणी,प्राचार्य दीपक बाविस्कर, रवींद्र दाभाडे नितीन तावडे, शिवाजी शिंदे आदींचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.