तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांच्या माध्यमातून सक्षम व्हावे – शमिभा पाटील यांचे प्रतिपादन

तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांच्या माध्यमातून सक्षम व्हावे
– शमिभा पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव, दि. 15  : शासन व प्रशासन तृतीयपंथीयांसाठी विविध योजना राबवित आहेत. तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींनी या योजनांचा लाभ घेऊन सक्षम व्हावे. असे आवाहन नाशिक विभागीय तृतीयपंथीय कल्याण मंडळाच्या सदस्या श्रीमती शमिभा पाटील यांनी केले.
जळगांव जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून (https://transgender.dosje.gov.in) या वेबसाईटवर नावनोंदणी करणे, ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण, जळगाव योगेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली एकदिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना श्रीमती. शामिभा पाटील म्हणाल्या की, शासन व प्रशासन तृतीयपंथीयांसाठी काम करीत आहे. त्याप्रमाणे तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींनी देखील यामध्ये सहभाग नोंदवावा. घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, अंतोदय योजना, शेळी पालन प्रशिक्षण याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. तृतीयपंथीयांना देखील इतर माणसांप्रमाणे जीवन जगण्याचे अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. वाय.आर.जी.केअर सेंटर चे लॉजिस्टीक सहायक पियुष चौधरी यांनी त्यांच्या संस्थेमार्फत तृतीयपंथीयांसाठी केल्या जाणाऱ्या कामकाजाविषयी माहिती दिली. यावेळी जिल्हाभरातून एकूण २७ तृतीयपंथी व्यक्ती उपस्थित होत्या. त्यापैकी ७ तृतीयपंथीय व्यक्तींना आभा कार्डचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आर. डी. पवार यांनी जिल्हास्तरीय तृतीयपंथी कल्याण मंडळ यांचेमार्फत जिल्हाभरातील तृतीयपंथीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच या योजनांचा लाभ मिळणेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तालुका समन्वयक किशोर माळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. अरुण वाणी, तालुका समन्वयक महेंद्र डी. पाटील, श्रीमती शिला अडकमोल, चेतन चौधरी, जितेंद्र धनगर, धनराज पाटील आदींनी प्रयत्न केले.
यावेळी विविध योजनांच्या लाभासाठी आवश्यक असलेले आधारकार्ड, मतदान कार्ड, नावात बदल केला असेल तर शासनाचे गॅझेट व ॲफिडेव्हीट, कोविड-१९ ची लस घेतल्याचे प्रमाणपत्र, बँक खाते बुक, जातीचा दाखला, पॅनकार्ड, शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र आदिंची जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी नोंदणी करावी. याबाबत काही अडचणी असल्यास सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर, महाबळ रोड, जळगाव येथे संपर्क (०२५७-२२६३३२८-२९) करावा. असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगांव यांनी केले आहे.