ग्राहकांनी आपले हक्क व अधिकार यांच्या सोबत आपल्या कर्तव्यांची देखील जोपासना केली पाहिजे- आँड.सुयश ठाकूर

ग्राहकांनी आपले हक्क व अधिकार यांच्या सोबत आपल्या कर्तव्यांची देखील जोपासना केली पाहिजे- आँड.सुयश ठाकूर

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे ‘जागतिक ग्राहक दिनानिमित्त’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी चोपड्यातील विधीज्ञ अॅड. सुयश भिकन ठाकूर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य एन.एस. कोल्हेे, उपप्राचार्य प्रा.डॉ. के.एन. सोनवणे आदि उपस्थित होते. महाविद्यालयामध्ये ग्राहकांच्या हक्काप्रती जनजागृती निर्माण करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना विभाग प्रमुख डॉ. सी. आर.देवरे म्हणाले की, वाणिज्य विषयाचे विद्यार्थी हे ग्राहकांचे हक्क व त्यांचे जबाबदाऱ्या याबद्दल जागरूक असतातच परंतु त्याचबरोबर त्यांनी समाजामध्ये देखील जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते अॅड.सुयश ठाकूर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये जनजागृती निर्माण केल्यास तसेच ग्राहकांना त्यांचे हक्क व जबाबदाऱ्या समजावून सांगितल्यास ग्राहकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही.त्याचप्रमाणे ऑनलाइन व ऑफलाइन खरेदी करत असतानाही आपल्याला अनेक जाचक अटींना सामोरे जावे लागते व वेगवेगळ्या अटी ज्या वॉरंटी कार्डमध्ये दिलेले असतात ते आपण व्यवस्थित बघून घेतल्या पाहिजे व कोणतीही वस्तू खरेदी करत असताना पक्के बिल घेणे महत्त्वाचे आहे’ यावेळी त्यांनी आज जर ग्राहकांना तक्रार करावयाची असेल तर जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर काय काय यंत्रणा आहेत याबद्दल तसेच विविध प्रकारच्या केसेसचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायदा १९८६ बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्याप्रसंगी बोलत असताना उपप्राचार्य एन.एस. कोल्हे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या व्याख्यानांचा लाभ घेतला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण एखादी गोष्ट शिकणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचे महत्त्व किती आहे समजणार नाही. त्यामुळे विद्यार्थी दशेत असताना आपण मार्केटिंगची विविध स्किल याबद्दल जितके शिकता येईल, तितके शिकले पाहिजे. ग्राहक व ग्राहकांच्या समस्या याबद्दल आपण जाणून घेऊन त्या पद्धतीने महाविद्यालयाच्या वतीने आपल्याला समाजामध्ये काही काम करता आले तर ते उत्तमच राहील.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील डॉ.एस.ए.वाघ यांनी देखील प्रश्न विचारून आपल्या शंका प्रमुख वक्त्यांना विचारल्या व त्याच्यातून आपले शंकांचे निरसन करून घेतले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील या चर्चेमध्ये सहभाग घेतला व आपल्या मनातील शंका विचारून त्यांनी शंकांचे समाधान करून घेतले.
या कार्यक्रमाप्रसंगी व्यवस्थापन विभाग प्रमुख ए.एच.साळुंखे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख व्ही.पी.हौसे आदि उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील सौ.एच.ए.सूर्यवंशी,सौ.पी.एस. जैन, ए.सी.जोशी, अमोल पवार यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सी.पी. बाविस्कर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी वाणिज्य विभागातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.