जिल्हाधिकाऱ्यांच्या कोविड मार्गदर्शक सूचनांचे पाचोरा नगरपालिके कडून उल्लंघन ? मृतांच्या टाळूवरचे लोणी खातंय कोण ?

जिल्हाधिकाऱ्यांच्या कोविड मार्गदर्शक सूचनांचे पाचोरा नगरपालिके कडून उल्लंघन ? मृतांच्या टाळूवरचे लोणी खातंय कोण ?
पाचोरा (वार्ताहर) दि,२९
राज्यभरात वाढलेल्या कोविड फैलावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.दररोज रुग्णसंख्या नवीन उच्चाक गाठत असल्याने कोणत्याही क्षणी पुन्हा लॉकडाऊन लागण्याचे चिन्ह आहेत. रुग्णसंख्ये सोबतच रुग्ण मृत्य पावण्याचे देखील प्रमाण वाढले आहे.अशा बाधित /संशयित मृत रुग्णांचे अंत्यसंस्कार स्थानिक स्वराज्य संस्थेने करावयाचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढून दिले आहेत.मात्र पाचोरा नगरपालिकेत जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचेच उल्लंघन होत असल्याचे चित्र असून मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठीची प्रक्रिया अनधिकृतपणे सुरू असून याबाबत कोणतीही निविदा प्रक्रिया झालेली नसल्याने संबंधितांकडून मृत रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक लूट होत असल्याचे समोर आले आहे.एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्यांचे नातेवाईका कडून अंत्यसंस्काराच्या समानासाठी दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत तर अशा सर्व मृत व्यक्तींचा अंत्यसंस्काराच्या खर्च हा पुन्हा पालिकेकडून संबंधित तोंडी आदेश देण्यात आलेला ठेकेदार वसूल करणार असल्याने नेमक्या या ठेकेदाराच्या मागे मृतांच्या टाळूवरचे लोणी कोण खातंय ? हे अनुत्तरीत असून याची चौकशी होऊन संबंधितांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे अवमान प्रकरणी कारवाई होणे गरजेचे झाले आहे.
वसूल करणार असल्याने
प्राप्त माहितीनुसार पाचोरा नगरपालिका एका मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सात हजार रुपये अदा करणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र हा दर निविदा प्रक्रिया पार पडण्याच्या आधीच का व कोणी निश्चित केला हे मात्र आकलनाच्या पलीकडे असून यात मृतांच्या टाळू वरचे लोणी खाण्यात कोण कोण भागीदार आहेत हे जनते समोर येणे गरजेचे झाले आहे व जिल्हाधिकाऱ्यांनी वा प्रांताधिकाऱ्यांनी देखील अशा बेजबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्यावर तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे. तसेच आमदार किशोर पाटील व नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी देखील या प्रकाराची तातडीने दखल घेत संबंधितांना जाब विचारणे गरजेचे आहे.
तसेच अनेक खाजगी कोविड केअर युनिट मध्ये देखील अशा मृत व्यक्तींच्या बॉडी पॅकिंगचे पाच पाच हजार व साहित्य खरेदीच्या नावाने दोन दोन हजार रुपये नातेवाईकांना मोजावे लागत आहेत तर हे शव स्मशानभूमी पर्यंत पोहचवण्यासाठी रुग्णवाहिका चालक मालक यांचे कडून अनधिकृत पणे एक हजार ते पंधराशे रुपये घेतले जात असल्याचे समोर आले आहे अशा रुग्णवाहिकांवर देखील प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.