महाराष्ट्र राज्यात दोन दिवसांचा लॉकडाऊन

मुंबई येथून नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार कोरोनाची वाढती व्याप्ती लक्षात घेता राज्यात शनिवारी आणि रविवारी असा दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून याबाबत आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री नवाब मलीक यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधतांना कडक उपाययोजना करण्याचे स्पष्ट केले होते. या संदर्भात दोन दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच देखील त्यांनी केले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रांमधील मान्यवरांशी संवाद साधून त्यांचे लॉकडाऊनबाबत मत जाणून घेतले होते.

दरम्यान, आज दुपारी तीन वाजता मंत्रीमंडळाची विशेष बैठक झाली. ही बैठक ऑनलाईन या प्रकारात झाली. यात लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत चर्चा करण्यात आली. यात महाराष्ट्रात आठवड्याच्या शेवटी दोन दिवसांचा लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा झाली. यानंतर राज्यात दर आठवड्याला दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

हा लॉकडाऊन शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू होऊन सोबवारी सकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, आठवड्यातील प्रत्येक रात्री ही संचारबंदी असून दिवसा राज्यभरात कलम-१४४ लागू करण्यात आले आहेत. यामुळे पाच जणांपेक्षा जास्त जणांना एकत्र येता येणार नाही. याशिवाय अन्य नियमावली देखील आखण्यात आली असून सरकारतर्फे याला लवकर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नवाब मलीक यांनी दिली.