राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत घरोबा करणाऱ्यांनी बसपाला शहानपण शिकवू नये! प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचा ‘बीआरएसपी’ला टोला

राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत घरोबा करणाऱ्यांनी बसपाला शहानपण शिकवू नये!
प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचा ‘बीआरएसपी’ला टोला

मुंबई, २३ मे

बहुजनांचे व्यापक हित लक्षात घेता मान्यवर कांशीराम यांच्या विचारधारेवर मा.सुश्री बहन मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाज पार्टीची वाटचाल सुरू आहे.गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील विविध महानगर पालिकांमध्ये बसपाचे नगसेवक विजयी होत आहेत.अशात जातीयवादी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत घरोबा करणाऱ्यांनी बसपाला शहाणपण शिकवू नये, असा टोला प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे (बीआरएसपी) राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सुरेश माने यांना लगावला.अँड.माने यांच्याकडून युतीसाठीचा जाहीर प्रस्ताव देण्यात आला होता.पंरतु, हा प्रस्ताव बसपाने धुडकावला आहे. २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानसभा लढलेल्या अँड.माने यांना एकाएकी आंबेडकरी राजकारणाचा पुळका कसा आला? असा सवाल देखील यानिमित्ताने अँड.ताजने यांनी उपस्थित केला.

माने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच युतीचा प्रस्ताव देत त्यांच्याशीच घरोबा करावा,असा उपरोधक टोला देखील अँड.ताजने यांनी लगावला.बसपा यंदाही संपूर्ण ताकदीनिशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याचे ते म्हणाले.पक्षाने राज्यभरात राबवलेल्या ‘महापौर बनाओ’ अभियानाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.अशात अनेक महापालिकांमध्ये बसपा ‘किंगमेकर’ ची भूमिका बजावणार आहे.त्यामुळे कुणाला सोबतच यायचे असल्यास त्यांनी बसपाच्या ‘हत्ती’ निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी,असे आवाहन देखील त्यांनी केले.

आंबेडकरी चळवळीचे सर्वस्वी हित लक्षात घेवूनच राज्यात बसपाची वाटचाल सुरू आहे.चळवळीला बळ देण्यासह सत्तेच्या चाबीही हातात येईल,याअनुषंगानेच बसपाची घोडदौड सुरू आहे. त्यामुळे ज्यांचा किरकोळही जनाधार नाही,अशांनी राष्ट्रीय पक्षाला शहाणपण शिकवू नये.हे पक्ष बसपाचा आधार घेवून आपला जनाधार वाढवण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. त्यासाठीच युतीचा प्रस्ताव देण्याचा खटाटोप त्यांच्याकडून सुरू असल्याचे अँड.ताजने म्हणाले.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर समाजाला घेऊन जाण्यासाठी मान्यवर कांशीराम साहेबांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय पक्ष बसपाच्या नेतृत्वात आणि ‘हत्ती’ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी हे प्रादेशिक पक्ष तयार असतील तरच सकारात्मक बोलणी शक्य असल्याचे अँड.ताजने म्हणाले.
….