घरोघरी तुळशी विवाह उत्साहात; परंपरा आजही कायम — विवाह मुहूर्ताचा शुभारंभ बुधवार पर्यंत

घरोघरी तुळशी विवाह उत्साहात; परंपरा आजही कायम — विवाह मुहूर्ताचा शुभारंभ बुधवार पर्यंत

 

 

 

प्रतिनिधी / दत्तात्रय काटोले

हिंदू संस्कृतीतील शिव परंपरेतील एक महत्त्वाचा सण म्हणजे तुळशी विवाह, हा कृषी संस्कृतीशी निगडित धार्मिक उत्सव. देव उठणी एकादशीपासून सुरू झालेला हा उत्सव यंदा मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. हा विवाह सोहळा दिनांक २ नोव्हेंबरपासून ५ नोव्हेंबर (कार्तिक पौर्णिमा) पर्यंत पार पडणार आहे.

या काळात घराघरात, मंदिरात तसेच विविध समाज संस्थांमध्ये श्री विष्णू आणि तुळशी मातेंच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. मंगलाष्टकांच्या स्वरात, ढोल-ताशांच्या गजरात “तुळशी विवाह झाला, शुभ लग्न लागतं” या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले आहे. श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचे सूर सगळीकडे गुंजत आहेत.

तुळशी विवाहानंतर देव उठतात आणि शुभ मुहूर्ताचा आरंभ मानला जातो. त्यामुळे या दिवसानंतर विवाह, गृहप्रवेश, मुंज, नामकरण यांसारख्या शुभकार्यांना सुरुवात केली जाते. त्यामुळे तुळशी विवाह हा केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक उत्सव म्हणूनही साजरा केला जातो.

शहरातील दत्त मंदिर,राम मंदिर, यांसह प्रत्येकाच्या घरासमोर

क्षेत्रीय देवस्थानांत भक्तांची गर्दी उसळली आहे. पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तुळशी वृंदावन फुलांनी सजवून, दिव्यांच्या प्रकाशात श्रीकृष्ण-तुळशीचा विवाह पारंपरिक पद्धतीने पार पडतो आहे.

तयारीत युवांची उत्साही सहभागिता

कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. संध्याकाळी सायंकाळच्या मुहूर्तावर विवाह केला जातो. वृंदावनास रंग लावून त्यावर स्वास्तिक काढतात, “राधा-दामोदर प्रसन्न” असे लिहितात. ऊस, खजूर, सुपारी, खोबरे, हळद-कुंकू, फराळाचे पदार्थ, अशा पारंपरिक सजावटीने तुळशीचे मंडप सजवले जातात. ऊसाला वधूच्या मामाचा मान दिला जातो.

या वर्षी तुळशी विवाहाचे शुभ दिवस

या वर्षी तुळशी विवाहाचा पर्वकाळ २, ३ आणि ४ नोव्हेंबर असा असणार आहे.

५ नोव्हेंबर रोजी पौर्णिमेच्या दिवशी व्यतीपात योग असल्यामुळे त्या दिवशी विवाह करण्यास मनाई आहे, असे वेदमूर्ती पुजारी महेश जोशी यांनी सांगितले.

तुळशी विवाह हा केवळ देवतांच्या जागृतीचा सोहळा नसून सदाचार, नातेसंबंधातील पवित्रता आणि भक्तीभावाचे प्रतीक असल्याने हा सण आजही घरोघरी मोठ्या श्रद्धेने साजरा केला जात आहे.