कोरोना काळात पालकांचे छत्र गमाविणाऱ्या विद्यार्थ्यांना चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आर्थिक मदत

कोरोना काळात पालकांचे छत्र गमाविणाऱ्या विद्यार्थ्यांना चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आर्थिक मदत

चंद्रपूर दि. १७ मे – कोरोना काळात पालकांचे छत्र गमाविणाऱ्या ३ विद्यार्थ्यांना आज चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत आर्थिक मदत करण्यात आली. चंद्रपूर महानगरपालिका शाळेत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३१,०००/- रूपये धनादेशरूपी अनुदान आज आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले.
चंद्रपूर शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभेत मनपा शाळेत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळात आई वडील गमावले आहेत त्यांना प्रत्येकी ३१,०००/- रूपयांची आर्थिक मदत देण्याचा ठराव पारीत करण्यात आला होता. त्यानुसार मनपा शाळेतील कु. कृतिका पुरुषोत्तम खेडकर – पंडीत जवाहरलाल नेहरू प्रा. शाळा, कु. आलिया परवीन आसीन शेख – सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा , कु. वैष्णवी विनोद अहिलापुरवार – लोकमान्य टिळक प्रा. शाळा या विद्यार्थ्यांना धनादेश अति.आयुक्त विपीन पालीवाल व उपायुक्त अशोक गराटे हस्ते मनपा मुख्य कार्यालयात देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आप्तांनी या प्रसंगी धनादेशाचा स्वीकार केला.
या लहान वयात आई वडीलांचे छत्र हिरावुन जाणे ही कधीही भरून न निघणारी हानी आहे. कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांना आपले पालक गमवावे लागले. मनपा शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांप्रती आपली जबाबदारी या नात्याने चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे दिल्या जाणाऱ्या या छोट्या आर्थिक मदतीने विदयार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागेल अशी आशा अति.आयुक्त विपीन पालीवाल यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
याप्रसंगी प्रशासन अधिकारी शिक्षण नागेश नीत तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.