उष्णतेच्या लाटेमुळे पिकांचे नुकसान; पंचनामे करून मदतीची शेतकऱ्यांची मागणी
सोयगाव, दत्तात्रय काटोले
सोयगाव : तालुक्यातील रवळा-जवळा, जामठी आणि पिंपळा शिवार परिसरात यंदाच्या हंगामात वाढलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाढत्या तापमानामुळे पिकांची वाढ खुंटणे, पाने व फुले गळणे तसेच फळधारणा कमी होण्याच्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सोयगाव तहसील कार्यालयात धाव घेत नायब तहसीलदार राहुल पत्रिके यांना निवेदन सादर केले. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून तात्काळ पंचनामे करावेत आणि शासनाकडून नुकसान भरपाई मंजूर करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात, “अवकाळी उष्णतेमुळे पिकांची स्थिती गंभीर झाली असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने मदत न दिल्यास शेतकरी संकटात सापडतील,” अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.
या निवेदनावर विलास देवलिंग साबळे, संभाजी पवार, नंदा विलास साबळे, ज्ञानेश्वर राजाराम वखरे, सरूबाई राजाराम वखरे, योगेश धरममित्र उधरोद, धरमार्जन केसरोद आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
फोटो, दत्तात्रय काटोले

























