समाधान शिबिरातून शेकडो नागरिकांना दिलासा; नांद्रा येथे यशस्वी आयोजन
विविध शासकीय योजनांचा लाभ; ३५९ हून अधिक लाभार्थ्यांची उपस्थिती
नांद्रा (ता.पाचोरा) ता.१९ नांद्रा येथे भवानी मातेच्या मंदिरावर आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिर तहसिलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात व यशस्वीपणे पार पडले. या शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला असून सुमा३५० हून अधिक लाभार्थींनी शिबिरास भेट देत विविध सेवांचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ५ लाभार्थींना लाभ देण्यात आला, तर पुरवठा विभागामार्फत ई-शिक्षा पत्रिकेचे ६० लाभार्थ्यांना डिजिटल कार्ड वितरित करण्यात आले. संजय गांधी व श्रावणबाळ योजनेंतर्गत अनुक्रमे १६ व ८ लाभार्थींना मदत देण्यात आली.
महसूल विभागाकडून ३६ फेरफार नोंदी निकाली काढण्यात आल्या. तसेच २० प्रकरणांमध्ये ७/१२दुरुस्ती, २२ वारस नोंदी करण्यात आल्या. ५७ डिजिटल ७/१२उतारे व १९ डिजिटल ८अ उतारे वितरित करण्यात आले. पीएम किसान योजनेअंतर्गत २५लाभार्थ्यांची त्रुटी पूर्तता करण्यात आली. विविध प्रकारचे ३३ दाखले देखील देण्यात आले.
याशिवाय एस.टी. महामंडळाच्या NPMC स्मार्ट कार्डसाठी ५० नोंदणी करण्यात आल्या तसेच एग्रीस्टॅक मंजुरीची ९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. भोगवटदार वर्ग-१ करण्यासाठी ५आदेश वितरित करण्यात आले.
सदर शिबिर माननीय उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, नायब तहसीलदार रंजीत पाटील, पुरवठा निरीक्षक सुषमा उरकुडे व नांद्रा मंडळाधिकारी वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
लोकप्रतिनिधी म्हणून अस्मिताताई पाटील, पद्मसिंह पाटील, नरेश पाटील, सुभाष तावडे व शशिकांत पाटील, विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये एकूण १५ विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. पाटबंधारे, महावितरण, वनविभाग, भूमिअभिलेख, पशुसंवर्धन व आरोग्य विभागांनी नागरिकांना विविध सेवा पुरवल्या. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने शिबिर यशस्वी ठरले.
सुत्रसंचलन ग्राम महसूल अधिकारी वर्षा काकुसते यांनी तर आभार मंडळाधिकारी वैशाली पाटील यांनी मानले.























