पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी; कॉंग्रेसचा पाठींबा
पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी या जिल्हा परिषद रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या आंदोलनाला कॉंग्रेस पक्षाने पाठींबा जाहीर केला आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून पिंपळगाव हरेश्वर ते जुना जरंडी या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून, या मार्गाच्या दुरुस्ती व विकासासाठी शेतकरी सातत्याने मागणी करत आहेत. मात्र, शासनाने या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. संबंधित रस्ता पूर्वी राज्य महामार्ग क्रमांकात समाविष्ट करण्यात आला होता. त्यानंतर त्याचा दर्जा जिल्हा ग्रामीण रस्त्यामध्ये बदलण्यात आला, तरीही महसुली नोंदींमध्ये अद्यापही राज्य महामार्गाची नोंद कायम असल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर अखेर शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला असून, प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दर्शविला. तसेच, प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन उपोषण सोडवावे, अन्यथा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तालुका पातळीवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.






















