Home महाराष्ट्र सोयगाव “वनपरिक्षेत्र कार्यालयाचे नवे पर्व सुरू” कॅम्पा निधीतून प्रशस्त प्रशासकीय इमारत उभारली;...

सोयगाव “वनपरिक्षेत्र कार्यालयाचे नवे पर्व सुरू” कॅम्पा निधीतून प्रशस्त प्रशासकीय इमारत उभारली; जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या हस्ते उद्घाटन

सोयगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाचे नवे पर्व सुरू

 

कॅम्पा निधीतून प्रशस्त प्रशासकीय इमारत उभारली; जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या हस्ते उद्घाटन

 

सोयगाव, दि. ११ :

 

गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याच्या खाजगी जागेत सुरू असलेल्या सोयगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाला अखेर स्वतःची प्रशस्त आणि सुसज्ज इमारत मिळाली आहे. वेताळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन बुधवारी (दि. ११) छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपवनसंरक्षक (प्रादेशिक) सुवर्णा माने यांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले.

 

वन विभागाच्या छत्रपती संभाजीनगर अंतर्गत वनपरिक्षेत्र कॅम्पा योजनेतून वर्ष २०२४-२५ च्या निधीतून या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. अनेक वर्षे भाड्याच्या घरात कार्यालय चालत असल्याने वारंवार घरमालकाच्या मर्जीप्रमाणे कार्यालय स्थलांतरित करावे लागत होते. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. नव्या इमारतीमुळे कार्यालयीन कामकाजाला स्थैर्य लाभणार असून वनविभागाच्या प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार आहे.

 

उद्घाटन प्रसंगी सहायक वनसंरक्षक एस. आर. भामरे, सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी वनसंवर्धन, वृक्षलागवड व पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले.

 

नागरिकांची मात्र गैरसोयीची तक्रार

 

दरम्यान, नव्याने उभारलेले वनपरिक्षेत्र कार्यालय सोयगाव शहरापासून सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर असल्याने तालुक्यातील सुमारे पन्नास गावांतील शेतकऱ्यांना आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी अतिरिक्त प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात गैरसोय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

“नवे कार्यालय स्वागतार्ह असले तरी ते शहराबाहेर असल्याने शेतकऱ्यांना पायपीट करावी लागणार आहे. किमान आवक-जावक टपाल व्यवहार सोयगाव येथूनच व्हावा,” अशी मागणी आमखेडा येथील शेतकरी संदीप इंगळे यांनी केली आहे.

 

वनविभागाचे स्वतःचे कार्यालय उभे राहिल्याने प्रशासनाला बळ मिळाले असले, तरी ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयींचाही विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

फोटो: दत्तात्रय काटोले

Don`t copy text!