Home महाराष्ट्र वाडी–रुद्रेश्वर डोंगररांगांत पळसाच्या बहराने पर्यटक मोहित फुलांमध्ये औषधी गुणधर्म – संवर्धनाची गरज...

वाडी–रुद्रेश्वर डोंगररांगांत पळसाच्या बहराने पर्यटक मोहित फुलांमध्ये औषधी गुणधर्म – संवर्धनाची गरज अधोरेखित

वाडी–रुद्रेश्वर डोंगररांगांत पळसाच्या बहराने पर्यटक मोहित फुलांमध्ये औषधी गुणधर्म – संवर्धनाची गरज अधोरेखित

 

 

सोयगाव, प्रतिनिधी दत्तात्रय काटोले :

गुलाबी थंडी ओसरत उन्हाळ्याची चाहूल लागताच सोयगाव परिसरातील रुद्रेश्वर लेणी आणि वाडी किल्ला परिसरात पळसाच्या फुलांचा तेजस्वी बहर पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. वाडी व रुद्रेश्वर श्रेणीतील डोंगररांगांत रस्त्याच्या कडेला, रानातील बांधावर तसेच जंगलव्याप्त भागात ठिकठिकाणी लालभडक पळस फुलला असून निसर्गसौंदर्य खुलून दिसत आहे.

उन्हाळा सुरू होताच अनेक झाडांना पानगळ होऊन जंगल निष्पर्ण दिसू लागते. मात्र अशा काळात पळसाचे झाड केशरी-लाल फुलांनी डवरते आणि संपूर्ण परिसराला आकर्षक रूप प्राप्त होते. रंगपंचमीच्या सणाची चाहूल लागताच पूर्वी पळसाच्या फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करून धुळवडीला रंगांची उधळण केली जात असे.

औषधी उपयोग महत्त्वाचे

प्राचीन काळापासून आयुर्वेदात पळसाच्या फुलां, पानां व बियांना औषधी महत्त्व आहे. उष्ण व तिखट पदार्थांमुळे होणारी मूत्रदाहाची समस्या कमी करण्यासाठी वाळवलेल्या फुलांचे चूर्ण दूध व खडीसाखरेसोबत घेतले जाते. मूळव्याधीवर पानांचा उपयोग केला जातो, तर उष्णता व रक्तस्राव कमी करण्यासाठी फुले उपयुक्त मानली जातात. त्वचारोगांवरही ग्रामीण भागात याचा वापर केला जात होता.

परंपरा हरवत चालली

पूर्वी लग्नसमारंभ किंवा घरगुती कार्यक्रमांत पळसाच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळी व द्रोण यांचा वापर होत असे. मात्र विज्ञानयुगात प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे या पारंपरिक पर्यावरणपूरक साधनांची जागा प्लास्टिकने घेतली आहे.

दरम्यान, बेकायदेशीर तोड व जळाऊ लाकूड म्हणून होणारी कत्तल यामुळे पळसाचे वृक्ष धोक्यात आले आहेत. पर्यावरणप्रेमींनी पळसाच्या झाडांची लागवड व संवर्धन करण्याचे आवाहन केले आहे.

वाडी–रुद्रेश्वर डोंगररांगांतील पळसाचा बहर सध्या देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घालत असून, निसर्गप्रेमींसाठी हा परिसर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

फोटो : दत्तात्रय काटोले

Don`t copy text!