ग्राहक संरक्षणासाठी डिजिटल प्रणालीचा वापर आवश्यक : संजय शहापूरकर 

ग्राहक संरक्षणासाठी डिजिटल प्रणालीचा वापर आवश्यक : संजय शहापूरकर

 

 

 

 

 

सोयगाव तालुका प्रतिनिधी : दत्तात्रय काटोले.

 

सोयगाव : तहसील कार्यालयात दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी मानवतेचे पुजारी लेखक व कवी यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय ग्राहक दिन व ग्राहक पंधरवडा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रतिमापूजन करून पुरवठा अधिकारी काकासाहेब साळवे, नायब तहसीलदार चैनसिंग बहुरे सोनवणे व जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य प्रदीप चव्हाण यांनी अभिवादन केले.

 

यानंतर आयोजित मार्गदर्शन सत्रात संजय शहापूरकर यांनी बदलत्या डिजिटल युगात ग्राहक संरक्षणासाठी डिजिटलीकरण अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. ऑनलाइन व्यवहार, डिजिटल पेमेंट प्रणाली, ई-तक्रार नोंदणी व तंत्रज्ञानाधारित सेवा यांमुळे व्यवहारात पारदर्शकता वाढून ग्राहकांना जलद व सुलभ सेवा मिळते, असे त्यांनी सांगितले. खरेदी करताना बिल घेणे, वस्तू व सेवांच्या दर्जाबाबत जागरूक राहणे आणि तक्रारी असल्यास अधिकृत मंचावर नोंद करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सोयगाव यांच्या वतीने तहसीलदार मनीषा मेने जोगदंड व पुरवठा अधिकारी काकासाहेब साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कुलकर्णी यांनी ग्राहक हक्क, तक्रार निवारण व्यवस्था तसेच डिजिटल साधनांचा प्रभावी वापर याविषयी सविस्तर माहिती दिली.

 

कार्यक्रमात ग्राहक संरक्षण कायदा, वजन-मापे नियमांचे पालन, स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाची भूमिका यावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. ग्राहक हक्कांविषयी जनजागृती वाढविणे ही काळाची गरज असून शासनाच्या विविध डिजिटल उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संजय शहापूरकर व प्रभु कुलकर्णी यांनी केले.

 

याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सोयगाव, जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य प्रदीप चव्हाण, तहसीलदार मनीषा मेने, पुरवठा अधिकारी काकासाहेब साळवे, चैनसिंग बहुरे, राहुल पाटील, सोनवणे, कांबळे, विजय सुभाष चोधरी व सोयगाव तालुक्यातील पत्रकार बांधव, भारत पगारे, विजय काळे, गोकुळसींग राजपूत, सुलेमान शेख, दत्तात्रय काटोले, भय्या चुनघरे,

विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून ग्राहक हक्कांविषयी व्यापक जनजागृती होऊन ग्राहक संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असे मत पुरवठा अधिकारी काकासाहेब साळवे यांनी व्यक्त केले.

 

फोटो दत्तात्रय काटोले