“पूल बनला मृत्यूचा सापळा” – सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायत झोपीत – दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

“पूल बनला मृत्यूचा सापळा” – सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायत झोपीत – दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

 

 

सोयगाव प्रतिनिधी : दत्तात्रय काटोले

 

सोयगाव येथील सोना नदीवरील पूल सध्या अत्यंत धोकादायक बनला असून, या पुलावरून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीव मुठीत धरून करावा लागतो. परतीच्या पावसामुळे पुलाच्या कडांवर मोठमोठे खड्डे पडले असून, लोखंडी गज उघडे पडले आहेत. तसेच संरक्षण कठडे खिळखिळे झाल्यामुळे केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांत व्यक्त होत आहे.

 

हा पूल सोयगाव-बनोटी, गोंदेगाव आणि चाळीसगाव या मार्गावरील मुख्य वाहतूक मार्गावर असल्याने येथे दिवसभर मोठी रहदारी असते. मात्र पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. पावसाच्या दिवसांत हे खड्डे पाण्याने भरून जात असल्याने वाहनधारकांचा तोल जातो, तसेच ते पाणी बाजूने जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडते. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत होत आहे.

 

नागरिकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायतीकडे पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली. परंतु प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांतून रोष व्यक्त होत असून, “मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

 

पुलाच्या पृष्ठभागाखालील लोखंडी गज उघडे पडले आहेत, तर संरक्षण कठडे पूर्णपणे सैल झालेले दिसतात. त्यामुळे एखादे वाहन घसरल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायत यांना तात्काळ दखल घेऊन पुलाची दुरुस्ती करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.