पाथर्डी आगाराच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांचे अतोनात हाल

पाथर्डी आगाराच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांचे अतोनात हाल

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) दिवाळी सुट्ट्यांचा संपत आलेला हंगाम व लग्न सराईचा प्रारंभ यामुळे पाथर्डी बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असून गाड्यांची टंचाई, आणि कर्मचाऱ्यांच्या टंचाईमुळे प्रवाशांना बस गाड्यांसाठी विनाकारण ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. गर्दीचा गैरफायदा घेण्यासाठी गुन्हेगारांचाही सुळसुळाट सुरू झाला आहे. दोन दिवसानंतर शाळा उघडणार आहेत.त्यातच येत्या एक नोव्हेंबर पासून पाच तारखेपर्यंत पंढरपूरचा कार्तिकी यात्रा महोत्सव सुरू होत आहे.यासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी बस गाड्यांचे नियोजन सुरू झाले आहे. पुणे महामार्गावर दर पंधरा मिनिटाला एक गाडी भरू शकेल ईतके प्रवासी पाथर्डी बस स्थानकावर असून स्थानिक आगारातून सुटणाऱ्या व बाहेरगावा वरून येणाऱ्या पुणे कडून येणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांना पाय ठेवायलाही जागा नाही एवढी गर्दी आहे. त्यातच आनखी भर म्हणून पाथर्डी आगाराने सायंकाळी पाच वाजता सुटणारी पुणे गाडी ही अचानकपणे बंद केली आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक यांना अर्धे तिकीट व वयोवृद्ध नागरिकांसाठी मोफत प्रवास असल्याने गर्दीचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. स्थानिक आगारातील लांब पल्ल्याच्या गाड्या पूर्णपणे आरक्षित होत असून ज्या गाड्यांना आरक्षण नाही त्या गाड्यांमध्ये जागा पकडण्यासाठी अनेक प्रवासी हे गाडीमागे धावतात. आगारातून बाहेर पडताना निवडक गाड्यांनाच फक्त फलक असतो. इतर गाड्यांचे फलक योग्य ठिकाणी लावले जात नसल्याने गाडी कोठे जाणार याची विचारणा करण्यापेक्षा आलेल्या गाडीमध्ये जागा पकडण्यासाठी संपूर्ण बसस्थानक परिसरा मध्ये गाडीच्या मागे प्रवासी,लहान मुले,महिला धावतात.आज दिनांक ३० ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बीड गाडीच्या मागे धावताना चिंचपूर येथील एक महिला ठेच लागून खाली पडून जखमी झाली. स्थानिक अधिकाऱ्यांनी फक्त अहिल्या नगर,पुणे,नाशिक व संभाजीनगर या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवली तर प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या सुमारे 25 बसेस या भगवान गडावर मुक्कामाला असतात.या सर्व बसेस सकाळी दहाच्या आत पुन्हा आलेल्या मार्गाने पुन्हा माघारी निघून जातात व मराठवाड्यातील विशेषतः गेवराई व बीड आगारातील गाड्या पुणे मुंबईकडे जाण्यासाठी सुरू होतात. सध्या तिकडूनच येणाऱ्या गाड्या या हाऊसफुल्ल भरून येत असल्याने काही बसेसचे प्रवेश दार सुद्धा कंडक्टर उघडत नाहीत.गाड्यांची देखभाल व दुरुस्ती सुद्धा वेळेवर होत नाही.

त्यातच पाथर्डी आगाराची एक नवीन गाडी मुंबई येथे अपघातग्रस्त होऊन एक महिना झाला आहे .तरी पण ती अद्याप पर्यंत पुन्हा मिळालेली नाही. त्यामुळे लांब पल्ल्याचे तीन वाहतूक मार्ग विस्कळीत झाले आहेत. गाडी मागे धावत सुटणारे प्रवासी व गाडीच्या प्रवेशद्वारात गर्दी करणारे प्रवासी हेरून काही सराईत गुन्हेगार विशेषतः महिला गुन्हेगार सोनसाखळ्या, पैशाचे पाकीट,मोबाईल चोरतात. असे अनेक प्रकार उघड झालेले आहेत.त्यामुळे स्थानिक पोलिसांनी आता दोन्ही व बस स्थानकांवर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पाथर्डी बसस्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी जागा पुरत नाही. शेवगाव कडे जाण्यासाठीच्या बसस्थानक परिसरात प्रतीक्षा ओटा आहे. बाहेरगावा वरून येणाऱ्या गाड्या थांबण्या साठीची जी जागा आहे. तेथेच शेवगाव – नेवासा- नाशिक या भागात जाणारे प्रवासी थांबत असल्याने बाहेरून आलेल्या गाड्यांना स्वतंत्र जागा नसल्याने जागा दिसेल तेथेच बसगाड्या उभ्या केल्या जातात.जुन्या बस स्थानकावर जुन्या स्वच्छता गृहाच्या बाजूकडून येणारा रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून 25 मीटर रस्त्यासाठी बस चालकाला जीव घेणी कसरत करावी लागत आहे.तो रस्ता सुद्धा बेकायदेशीर आहे. मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. मध्यवर्ती बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा समोर उंच झालेले गटारीचे काम व आतील बाजूने निर्माण झालेला खड्डा येथे शिवाई बसेस घासतात. मात्र या खड्ड्यामध्ये माती मुरूम टाकून किंवा गटारीवरील उंची कमी करून घेण्यासाठी स्थानिक आगारातील कोणीही अधिकारी गांभीर्याने

पहात नाही. सध्या शाळांना सुट्टी असल्याने ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना गावात जाणाऱ्या बसगाड्यांची तूर्तास गरज दिसत नाही. त्यामुळे या बसगाड्या अहिल्यानगर आणि पैठण विभागासाठी वापरता येऊ शकतात. अहिल्यानगर विभागातच गाड्यांची तीव्र टंचाई असून बसस्थानकावर प्रवासी आहेत तर गाड्या नाहीत. त्यामुळे आगाराला उत्पन्नही नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.हे विदारक चित्र पाहताना प्रामाणिक कर्मचाऱ्यांना सुद्धा अतिशय खंत वाटत आहे. बसगाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अनेक कर्मचाऱ्यांची टंचाई जाणवत असल्याने अनेक वेळा गरजेच्या वेळी कर्मचारी उपलब्ध होत नाहीत.ज्यादा बस गाड्यांचे नियोजन नसल्याने निश्चित ठिकाणी कधी बस जाणार आहे याची सुतराम कल्पना प्रवाशांना मिळत नाही. पाथर्डी तील जुन्या बस स्थानकामध्ये अवैद्य प्रवासी वाहतूक करणारी वाहने थेट फलाटावर लागून प्रवाशांना घेऊन जातात. तेथे सुरक्षा रक्षकच नसल्याने पाथर्डी बसस्थानक हे प्रवाशांसाठी आहे की खाजगी गाडीवाल्यांच्या पार्किंग साठीचे बसस्थानक आहे असा प्रश्न निर्माण व्हावा एवढी वाहने येथे लागलेली असतात.नव्याने तयार केलेले प्रवेशद्वार सुद्धा खाजगी वाहनांमुळे बस चालकांसाठी त्रासदायक बनले आहे.विभाग नियंत्रकांनी पाथर्डी आगारासाठी तातडीने किमान सुस्थितीतील पाच बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी सर्व सामान्य प्रवाशांची मागणी आहे.पाथर्डीतील प्रवासी वाहतूक व्यवस्था अतिशय कोलमडली असून विभाग नियंत्रकांनी या बाबींकडे त्वरित लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.