डॉ. सुभाष तळेले यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव – केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील वरिष्ठ लघुलेखक डॉ. सुभाष रूपचंद तळेले यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी ‘जनसंवाद आणि पत्रकरिता’ या विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान केली आहे. त्यांनी प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय – “मराठी वृत्तपत्रांनी योगविषयक केलेली जागरूकता व त्याचा जनमानसावरील परिणाम: चिकीत्सक अध्ययन” (विशेष संदर्भ: जळगाव जिल्ह्यातील दैनिक दिव्य मराठी, लोकमत व सकाळ) असा होता. या संशोधनात जळगाव जिल्ह्यातील मराठी दैनिकांमधून योगाबाबत जनजागृती कशी घडते आणि त्याचा समाजाच्या विविध घटकांवर आरोग्यविषयक व सामाजिक वर्तनावर काय परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
या संशोधनातून योगशास्त्रासारख्या प्राचीन व आरोग्यदायी विषयाचे महत्त्व मराठी माध्यमांनी प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवले आहे. विशेषतः कोविड–१९ महामारीच्या काळात मराठी वृत्तपत्रांनी श्वसनविकारांचे प्रतिबंध, रोगप्रतिकारशक्ती वृद्धीचे उपाय आणि मानसिक स्थैर्य राखण्याच्या तंत्रांची माहिती देत लोकांमध्ये योगाविषयीची जागरूकता वाढवली. या माध्यमातून प्रेरित होऊन अनेक वाचकांनी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवला आणि आरोग्यात लक्षणीय सुधारणा अनुभवली. तसेच या संशोधनात माध्यमांची सामाजिक जबाबदारी, लोकांच्या आरोग्यविषयक जाणिवा आणि त्यातून निर्माण होणारा सकारात्मक बदल यांचा सखोल अभ्यास झाला आहे. वृत्तपत्रे केवळ बातम्यांचे साधन न राहता समाजमन घडविणारी आणि आरोग्यविषयक दृष्टिकोन बदलणारी प्रभावी साधने ठरतात, हे निष्कर्षातून अधोरेखित झाले आहे. योगशास्त्राचा ऐतिहासिक प्रवास, प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत आणि त्यावरील मराठी वृत्तपत्रांतून झालेली जनजागृती यांचा तुलनात्मक आढावा या अभ्यासात घेण्यात आला. कोविड काळात या वृत्तपत्रांनी योगाच्या वैज्ञानिक व मानसिक पैलूंवर विशेष भर दिल्याने लोकांच्या आरोग्यदृष्टीत सकारात्मक परिवर्तन झाले.
जळगाव जिल्ह्यातील मराठी दैनिकांनी सातत्याने योगविषयक माहिती प्रसिद्ध करून समाजजागृतीत मोलाचा वाटा उचलला आहे. विविध वयोगटांतील वाचकांनी या माहितीचा उपयोग करून आरोग्यविषयक सवयी आत्मसात केल्या व योगाभ्यासातून आरोग्य सुधारले. कोविडच्या आव्हानात्मक काळात या वृत्तपत्रांनी दिलेली मार्गदर्शक माहिती मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी आधारभूत ठरली. एकंदर मराठी वृत्तपत्रे केवळ माहिती पुरवणारे माध्यम नसून आरोग्यविषयक प्रबोधन, प्रेरणा आणि सामाजिक परिवर्तन घडविणारी एक प्रभावी माध्यमव्यवस्था आहेत.
डॉ. सुभाष तळेले यांनी यापूर्वी दैनिक सकाळ या प्रतिष्ठित वृत्तपत्रात पुणे, नाशिक व जळगाव येथे तब्बल १० वर्षे कार्य केलेले आहे. त्यानंतर गेली २० वर्षे ते मू.जे. महाविद्यालयातील प्रशासन विभागात कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत प्रशासन, माध्यम क्षेत्र आणि योग या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. त्यांच्या या विशेष यशाबद्दल के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, तसेच के.सी.ई.सोसायटी व्यवस्थापन मंडळ सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. तसेच महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांचे उपप्राचार्य, अधिष्ठाता व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनीं यांनी कौतुक करून त्यांना भविष्यातील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या शैक्षणिक यशामुळे के.सी.ई.सोसायटी संचालित मू.जे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

















