पाचोरा एम एम कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान मंडळाचे उद्घाटन

पाचोरा एम एम कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान मंडळाचे उद्घाटन

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित, श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी होते, संस्थेचे जेष्ठ संचालक डॉ जयंतदादा पाटील प्रमुख अतिथी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस एस पाटील यांनी केले.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक’ स्वरूपात विज्ञान मंडळाच्या वतीने विविध वृक्षांची रोपे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावणारी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी युगंधरा राजेंद्रसिंग पाटील, कोन बनेगा करोडपती या कार्यक्रमात साडेबारा लाख रुपये जिंकणारा विद्यार्थी साकेत नंदकुमार सोनार, छत्रपती संभाजी नगरच्या मेडिकल कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी निवड झालेला डॉ सिद्धार्थ साहेबराव पाटील, अमरावतीच्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये एमबीबीएस या कोर्ससाठी सिलेक्शन झालेला सुधाकर किसन बंजारा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, भोपाळ या ठिकाणी निवड झालेला विवेक विनोद महाजन या सर्व माजी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. युगंधरा पाटील , साकेत सोनार, डॉ सिद्धार्थ पाटील, सुधाकर बंजारा या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतातून आपला संघर्ष विद्यार्थ्यांसमोर कथन केला.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा राजेंद्र चिंचोले यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या करिअरच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात केवळ कागदावरचे गुण म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे, केवळ कागदावरचे गुणांच्या आधारे विद्वत्तेचे मोजमाप न करता स्वतःची ओळख आणि आपली बलस्थाने यांचा विचार करून आपल्यातील कुवत याचा विचार विद्यार्थी व पालकांनी करावा; आपल्याला ज्यामध्ये आनंद वाटतो तेच क्षेत्र करिअरसाठी निवडावे, असेही त्यांनी सांगितले. आपल्या अंगी असलेल्या गुणांचा, कलेचा, क्षमतांचा विकास करण्याचा सल्ला त्यांनी दिला. मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी ,आर्किटेक्चर, संशोधन, कृषी याव्यतिरिक्त विज्ञान, शाखेतील करिअरच्या विविध शाखा याबद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रत्येक व्यक्तीमध्ये एखादा असामान्य गुण असतो फक्त तो ओळखता आला पाहिजे अशा प्रकारच्या अपेक्षा विद्यार्थ्यां कडून व्यक्त केल्या. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अतुल सूर्यवंशी यांनी केले तर आभार डॉ छाया पाटील यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान मंडळाचे प्रमुख प्राध्यापक स्वप्निल ठाकरे, डॉ दिलीप पाटील,प्रा ललित पाटील, डॉ छाया पाटील, प्रा वासंती चव्हाण, प्रा शोनक पाटील, प्रा एम व्ही पाटील, प्रा एम के पाटील,प्रा गिरीशचंद्र पाटील, प्रा कल्पेश सांगवीकर, प्रा ऋतुजा जोशी, प्रा इंदिरा बोर्डे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस एस पाटील, पर्यवेक्षक डॉ जे पी बडगुजर, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.