सोयगावच्या ‘संगम दुर्गा मित्र मंडळा’चा अनोखा संकल्प
तुळजापूर ते सोयगाव पायी जोत; व्यसनमुक्तीसाठी तुळजामातेच्या चरणी साकडे
सोयगाव (प्रतिनिधी) –दत्तात्रय काटोले
सध्या समाजात वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येला थांबवण्यासाठी सोयगाव येथील संगम दुर्गा मित्र मंडळाने एक आगळा वेगळा संकल्प करत उदाहरण घालून दिले आहे. मंडळाच्या ६० ते ७० सदस्यांनी तुळजापूर ते सोयगाव असा पायी प्रवास करत तुळजा भवानी मातेच्या चरणी व्यसनमुक्तीचे साकडे घातले.
या पायी यात्रेचा उद्देश फक्त धार्मिक नव्हता, तर समाजात व्यसनमुक्तीचा जागर निर्माण करणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता. या प्रवासात मंडळाच्या सदस्यांनी तुळजापुरात जाऊन मातेच्या चरणी संकल्प केला की, “आम्ही जे व्यसन करत आहोत, ते सोडण्याचा पूर्ण प्रयत्न करू – आणि इतरांनाही यासाठी प्रेरित करू.”
गावात परतल्यावर मंडळाने एकत्र येऊन हा संदेश संपूर्ण मित्र मंडळांमध्ये पोहोचवला. यामध्ये महिलांचा विशेष सहभाग होता. त्यांनी पाठींबा देत या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. महिलांनी गावातील अन्य तरुणांनाही व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहित केले. मंडळाच्या या उपक्रमामुळे संपूर्ण गावात सकारात्मक ऊर्जा पसरली आहे.
संगम दुर्गा मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावात यापूर्वी कधीही अशा प्रकारची जोत आणण्यात आली नव्हती, त्यामुळे हा उपक्रम अधिकच लक्षवेधी ठरला. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक जबाबदारी यांची सांगड घालणारा हा उपक्रम इतर मंडळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.