चोपडा महाविद्यालयात ‘महिला तक्रार निवारण जाणीव जागृती कार्यशाळा’ उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘महिला तक्रार निवारण जाणीव जागृती कार्यशाळा’ उत्साहात संपन्न

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात ‘महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ अधिनियम कायदा 2013’  या विषयावर आधारित ‘जाणीव जागृती कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ. आर. एम.बागुल उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, चोपडा शहरातील सुप्रसिद्ध विधीज्ञ ऍड. निर्मल देशमुख, वंदना ठाकरे,  कनिष्ठ  महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी.एस. पाडवी, महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख सौ. माया शिंदे आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख सौ. माया शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. शुभांगी पाटील यांनी सुरेल स्वागत गीत सादर केले. यावेळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे उदघाटपर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,’महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे महिला व विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यायला हवेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता अन्याय, अत्याचार होत असल्यास तक्रार नोंदविण्यासाठी आवाहन केले. त्यावेळी त्यांनी दामिनी पथक, अत्याचारविषयक पोक्सो कायदा,  तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस विभागातर्फे उपलब्ध करण्यात आलेले किंवा क्युआर कोड याबद्दलची सविस्तर माहिती विद्यार्थिनींना तसेच महिला प्राध्यापिकांना दिली.

या कार्यशाळेप्रसंगी ‘महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ व अधिनियम 2013 जाणीव जागृती’ या विषयावर मार्गदर्शन करताना मार्गदर्शक व चोपडा शहरातील सुप्रसिद्ध विधीज्ञ ऍड. निर्मल देशमुख म्हणाले की, स्त्री शिक्षणाचे प्रमाण वाढविले पाहिजे त्यामुळेच स्त्रियांमध्ये कायदेविषयक जाणीव व जागृती निर्माण होईल. संविधान कायद्याअंतर्गत महिलांची सुरक्षा करण्यास मदत होते त्यामुळे महिलांच्या संरक्षण विषयक कायद्यांची ओळख करून घेणे काळाची गरज आहे’. यावेळी त्यांनी  अहिराणी लोकगीताद्वारे महिला भगिनींच्या वास्तवावर भाष्य केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘महिलांनी कायद्याचे शिक्षण घेणे अत्यावश्यक आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार विरोधात कायदेशीर पाऊल उचलून अत्याचारास तोंड दिले पाहिजे तरच अन्याय अत्याचाराला आळा बसेल’.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आरती बी.पाटील यांनी केले तर आभार सौ. विशाखा देसले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापिका व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.