छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसांची तंबाखूजन्य पदार्थांविरोधात धडक कारवाई: 102 जणांवर गुन्हे दाखल, ₹22,058 किमतीचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसांची तंबाखूजन्य पदार्थांविरोधात धडक कारवाई: 102 जणांवर गुन्हे दाखल, ₹22,058 किमतीचा मुद्देमाल जप्त

 

छत्रपती संभाजीनगर (दि. 19 सप्टेंबर):

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर लगाम घालण्यासाठी एकदिवसीय विशेष मोहीम राबवली. या कारवाईत एकूण 102 जणांविरुद्ध COTPA 2003 (Cigarettes and Other Tobacco Products Act) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ₹22,058 किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी करण्यात आली.

 

जिल्ह्यातील 23 पोलीस ठाण्यांतील प्रभारी अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथके तयार करून शाळा, कॉलेज, देवस्थान परिसर व अन्य गर्दीच्या ठिकाणी छापे टाकले.

 

या कारवाईत पानटपरी चालक, किराणा दुकानदार, हातगाडीधारक इत्यादींकडून सुगंधी मावा, जर्दा, गाय छाप, मजूर बीडी यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना सापडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

 

सदर मोहीमेचे आयोजन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह राजपुत यांनी केले होते. त्यांनी सर्व 23 पोलीस ठाण्यांतील प्रभारी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली.

 

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री किंवा सेवन होत असल्याचे आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. अशी कारवाई पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.