बारी समाजाच्या हक्काचा सवाल : ‘संत श्री रूपलाल महाराज’ स्मारक त्वरित उभारावे
शासनाच्या गप्पी आणि घोषणांना कंटाळलेल्या बारी समाजाचा एकमुखी आवाज – ‘आता आमचेही दिवस यावे!’
प्रतिनिधी, सोयगाव (दत्तात्रय काटोले)
राजे-रजवाड्यांच्या शाही थाटात मानाचे स्थान मिळवणाऱ्या विड्याच्या पानांची लागवड करणारा बारी समाज आजही २१व्या शतकात उपेक्षिततेच्या अंधारात जगतो आहे. पारंपरिक शेतकी वारसा, व्यवसाय आणि कष्टकरी जीवनशैली असूनही बारी समाजाला शासनाच्या विकासयोजना, शिक्षण, आर्थिक प्रगती यापासून सातत्याने दूर ठेवले गेले आहे.
इतिहासाची शान, वर्तमानाची शोकांतिका
हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या बारी समाजाने विड्याचे पान म्हणजेच गोविंद विडा निर्मितीमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले आहे. परंतु नैसर्गिक संकटे, स्थलांतर, शिक्षणाचा अभाव आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे आजही बारी समाजातील बहुतांश लोक शेतमजुरी, अल्पभूधारक शेतकरी आणि अस्थिर रोजगाराच्या गर्तेत अडकले आहेत.
समाजाची विदारक स्थिती
बारी समाजातील ८०% पेक्षा जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात राहत असून त्यांना मुलभूत सुविधा देखील अपुऱ्या आहेत.
९०% च्या पुढे गुण मिळवणारे विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून वंचित आहेत.
परंपरागत विड्याचे पान उत्पादन धोक्यात, रोजगाराच्या संधी मर्यादित.
विदर्भात आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याने समाजाला भीषण संकटाचा सामना करावा लागत आहे.
शासनाची घोषणा – प्रत्यक्षात काय?
महाराष्ट्र शासनाने नुकतेच ‘संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करण्याचा प्रस्ताव जाहीर केला असून, अमरावती जिल्ह्यात संत श्री रूपलालq महाराज स्मारक उभारण्याची घोषणा बजेटमध्ये केली आहे. मात्र समाजाचा रोष आहे की, केवळ घोषणांनी नाही तर कृतीने न्याय दिला जावा.
समाजाच्या ठाम मागण्या
स्मारकाचे भूमिपूजन दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणे बंधनकारक करावे.
प्रत्येक जिल्ह्यात ‘संत रूपलाल महाराज भवन’ची निर्मिती.
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना लागू करावी.
महानगरांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष होस्टेल सुविधा.
‘महाज्योती’च्या धर्तीवर कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था.
विड्याच्या पान लागवडीसाठी संशोधन केंद्रांची स्थापना.
पानपिंपरीवर आधारित औषधनिर्मिती व निर्यातीला प्रोत्साहन.
राजकीय आणि सामाजिक वजन
महाराष्ट्रात ५० लाखांहून अधिक आणि देशभरात ४ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या बारी समाजाचा लोकशाहीत निर्णायक वाटा आहे. विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बारी समाजाचे मतदान निर्णायक ठरत असताना, त्यांची उपेक्षा हा शासकीय अन्यायच मानावा लागेल.
एक स्मारक, एक प्रेरणा!
‘संत श्री रूपलाल महाराज’ स्मारक केवळ एका विभूतीची आठवण ठरणार नाही, तर बारी समाजाच्या स्वाभिमानाचे, विकासाचे आणि ओळखीच्या पुनःस्थापनेचे प्रतीक ठरेल. शासनाने निव्वळ घोषणा करून थांबू नये, तर दिवाळीपूर्वी स्मारकाचे भूमिपूजन करून समाजाच्या भावनांना दाद द्यावी.
थेट संदेश सरकारला:
“घोषणांपेक्षा कृती महत्त्वाची आहे!
बारी समाजाच्या मागण्यांना केवळ आश्वासनांनी नव्हे, तर कृतीने उत्तर द्या!”