मराठा समाजाच्या मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन; महिलांवरील अपशब्दप्रकरणीही कारवाईची मागणी
सोयगाव (प्रतिनिधी): मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार ओबीसी (कुणबी) प्रवर्गात समाविष्ट करून प्रमाणपत्रे मिळावीत, तसेच नागरिकांना आवश्यक माहिती मिळण्यासाठी स्वतंत्र माहिती कक्ष (टेबल) तहसील कार्यालयात स्थापन करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या सोबतच, लक्ष्मण हाक्या या व्यक्तीने मराठा समाजातील महिलांविषयी अत्यंत अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरली असून, त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशीही मागणी समाजबांधवांनी दुसऱ्या निवेदनाद्वारे केली.
या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे विजय काळे, नगरसेवक बंटी काळे, युवासेना तालुका प्रमुख अँड. योगेश पाटील, संदीप चौधरी, भागवत थोडे, विजय गव्हाड, कृष्णा जुंनघरे, गाडेकर, ऋतिक चौधरी, राजू बडख, नितीन पाटील आदी समाजबांधव उपस्थित होते.
मराठा समाजाच्या विविध मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आणि महिलांवरील अपमानासारख्या प्रकारांना आळा बसावा यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

















