तावसे बु!! येथील सरपंचच्या पतीने गावात अतिक्रमण विरोधात गटविकास अधिकारी कार्यालयात उपोषण

तावसे बु!! येथील सरपंच पतीच्या अतिक्रमण विरोधात गटविकास अधिकारी कार्यालयात उपोषण…
चोपडा प्रतिनिधी :-
तावसे बु. येथील विद्यमान सरपंचाच्या पतीने गावात अतिक्रमण केलेल्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढून कार्यवाही न झाल्यामुळे नागरीक संदीप अमृत बाविस्कर हे उपोषणास बसले आहेत.
तावसे बु. येथील सरपंच सौ. कमलबाई जीवनलाल चौधरी यांचे पती जीवनलाल विश्राम चौधरी यांनी गावातील मुख्य रस्त्यावर व त्या लगतच्या जागेवर अतिक्रमण करुन पत्रीशेड उभे केले आहे. तरी त्यांनी अंदाजे २८० स्के. फुट अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना व रहदारीस अडथळा निर्माण होतो. तरी त्याबाबत त्यांना समजाविले असता त्यांनी पदाचा गैरवापर करुन उपोषण कर्त्यास धमकाविले, व तुमच्याने जे होईल ते करा , मी जागा खाली करणार नाही, माझी पोहच वर पर्यंत आहे, तुम्ही माझे काहीही बिघडवू शकणार नाही असे सांगीतले व त्यांनी बेकायदेशीररित्या सार्वजनीक रस्ता व जागेवर केलेले अतिक्रमण हटविले नाही.
तरी वरील सार्वजनीक जागा व रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे बाबत उपोषण कर्त्याने तावसे बु. ग्रा.पं. ग्रामसेवक, गट विकास अधिकारी , तहसिलदार , मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., जिल्हाधिकारी यांना अर्ज दिलेले आहे. परंतु आज रोजी पर्यंत फक्त चौकशी झालेली आहे, मात्र सरपंचाच्या पतीवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही अथवा अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही.जर उपोषण कर्त्यास न्याय मिळाला नाही तर ते मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय जळगाव येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत.
उपोषण स्थळी गट विकास अधिकारी यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यास उपोषण मागे घेण्यासंदर्भात धमकी दिली. तुला इथं उपोषण करण्याची परवानगी कोणी दिली ? तू गटविकास अधिकारी कार्यालय परिसरात उपोषण करू शकत नाही. अशा प्रकारचे वक्तव्य गटविकास अधिकारी यांनी केले असल्याचे उपोषण कर्त्याने सांगितले.
सायंकाळी ६ वाजता उपोषण सोडणे वेळी गट विकास अधिकारी उपोषण कर्त्याजवळून गेले पण उपोषण सोडण्यासाठी थांबले नाहीत आणि कोणत्याही प्रकारचे आश्वासन दिले नाही. शेवटी उपोषण कर्त्याचे मित्रमंडळी विनायक पाटील , हेमकांत गायकवाड , बाळू कोळी , समाधान कोळी आदिंनी उपोषण कर्त्यास ऊसाचा रस पाजून उपोषण सोडविले…