सोयगाव एस.टी. बसस्थानकावरील कॅन्टीन ‘आर्थिक व्यवहार केंद्र’!महिला प्रवाशांची कुचंबना, प्रशासन झोपेत
सोयगाव (प्रतिनिधी) –
सोयगाव येथील एस.टी. बसस्थानकावरील कॅन्टीन उपहारगृह न राहता एका ‘आर्थिक व्यवहाराच्या अड्ड्या’मध्ये रूपांतरित झाले आहे. प्रवाशांसाठी उभारलेले हे कॅन्टीन केवळ नावालाच असून, येथे ना चहा मिळतो, ना नाश्ता, ना पिण्याचे पाणी. विशेष म्हणजे, या कॅन्टीनमध्ये सतत अनावश्यक गर्दी असते, त्यामुळे महिला प्रवाशांची प्रचंड कुचंबना होत आहे. आगार प्रमुख या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कॅन्टीन आहे की केवळ टाइमपासचे ठिकाण?
गेल्या अनेक वर्षांपासून हे कॅन्टीन एका ठराविक व्यक्तीकडेच आहे. नियमानुसार प्रवाशांना मिळणाऱ्या आवश्यक सेवा पूर्णपणे बंद आहेत. चहाच्या कपाऐवजी येथे चर्चेचे अड्डे रंगलेले असतात. टवाळखोर मंडळी येथे तासन् तास बसलेली असतात, त्यामुळे महाविद्यालयीन तरुणी आणि महिला प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आगार प्रमुखांचा निष्क्रियपणा!
प्रवाशांच्या हितासाठी उपाययोजना करणे हे आगार प्रमुखांचे कर्तव्य असताना, त्यांनी अक्षरशः झोपेचे सोंग घेतले आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
भाडेतत्त्वावर देण्याची मागणी तीव्र
या पार्श्वभूमीवर, कॅन्टीनची व्यवस्थापन पद्धत बदलण्याची प्रवाशांकडून जोरदार मागणी होत आहे. छत्रपती संभाजीनगर परिवहन विभागाने यात तातडीने लक्ष घालून, हे कॅन्टीन भाडेतत्त्वावर देण्याची पारदर्शक प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे, हे कॅन्टीन एक होतकरू दिव्यांग व्यक्तीस उदरनिर्वाहासाठी देण्यात यावे, जेणेकरून त्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल, अशी भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.
कॅन्टीन धारकाचे कथित वाईट प्रवृत्तीशी संबंध असून, हे ठिकाण आर्थिक देवाणघेवाणीच्या संदिग्ध व्यवहारांसाठी वापरण्यात येत असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

















