ऐन महसूल सप्ताहात नायब तहसीलदार यांच्या नावाखाली तिसगाव-आडगाव सजाचे तलाठी धरम यांना पन्नास हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले,पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र शासनाचा महसूल सप्ताह हा संपूर्ण राज्यभर सुरू असताना पाथर्डीचे नायब तहसीलदार यांच्या नावाखाली तिसगाव-आडगाव सजाचे तलाठी सतीश धरम यांना पन्नास हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.या बाबतची माहिती अशी की पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका तक्रारदार इसमाच्या वडीलांच्या नावाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे.सदर घरकुलाची पायाभरणी करण्यासाठी तक्रारदार यांनी नदीपात्रातून दोन ट्रॅक्टर मुरूम आणि जाडसर वाळू बांधकामाच्या ठिकाणी आणून टाकली होती. सदर मुरूम आणण्यासाठी त्यांनी त्यांचे चुलते आणि मित्र यांच्या जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टरचा वापर केला होता. या प्रकरणातील तलाठी सतीश धरम आणि पाथर्डीचे नायब तहसीलदार सानप यांनी रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी येऊन पाहणी केली होती.त्यानंतर तलाठी सतीश धरम यांनी तक्रारदार यांना म्हटले की तुम्ही गौण खनिजाची (वाळू) अवैध मार्गाने वाहतूक केली आहे.तुमच्या वाहनावर व तुमच्यावर कारवाई होऊ द्यायची नसेल तर नायब तहसीलदार यांना पन्नास हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून तलाठी सतीश धरम यांनी तक्रारदार यांच्या वाहनावर व मुरूम ढीगाऱ्यावर अवैध गौण खनिज वाहतूकीची कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 50,000 रुपयांची लाचेची मागणी केली आहे.ती सदरची लाचेची रक्कम तक्रारदार यांच्या कडून तलाठी धरम यांनी स्विकारून ती लाच खाजगी इसम घोरपडे यांच्या कडे दिलेली आहे.लाचखोर तलाठी यांना ताब्यात घेऊन पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई नाशिक परीक्षेत्राचे लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे,अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे साहेब तसेच सापळा पथकातील पोलिस कॉन्स्टेबल रवी निमसे, बाबासाहेब कराड, चालक हारून शेख यांच्या पथकाने केली आहे. नाशिक विभागातील अहिल्या नगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ ॲंटीकरप्शन ऑफ ब्युरो,अहिल्यानगर शहरातील सावेडी भागातील तहसील कार्यालया जवळील कार्यालयातील दुरध्वनी क्रमांक ( 0241)2423677 आणि मोबाईल नंबर 8329701344, आणि टोल फ्री क्रमांक 1064 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी तलाठी कार्यालयात कोणत्याही खासगी ईसमास थांबण्यास सक्त मनाई केली असतानाही अजूनही अनेक तलाठी कार्यालयात तलाठ्याने खाजगी दलाल ठेवलेले दिसत आहेत.ज्या तलाठी कार्यालयात हे खाजगी दलाल ठेवले आहेत त्या तलाठ्यावर ही महसूल मंत्र्यांच्या आदेशानुसार कडक कारवाई करावी अशी सर्व सामान्य नागरिकांनी मागणी केली आहे. लाचखोर तलाठी हा मीरी येथील रहिवासी असून तो कासार पिंपळगाव येथे ही काही दिवस तात्पुरता भार सांभाळत कार्यरत होता.आडगाव या गावातील सजात नेमणुकीस असताना.तिसगाव येथे तात्पुरता अधिभार देण्यात आला होता.सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून “जेथे जाउ, तेथे खाऊ” हेच तत्त्व या महाशयांनी अवलंबीले होते.