दुहेरी हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई करा – आ. सत्यजीत तांबेंची मागणी- आ. तांबेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले पत्र

दुहेरी हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई करा – आ. सत्यजीत तांबेंची मागणी- आ. तांबेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले पत्र

प्रतिनिधी, अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील दाम्पत्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई व्हावी, यासाठी सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. राज्यातील वकिलांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाचा प्रलंबित ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲडव्होकेट्स वेल्फेअर ॲक्ट येत्या अधिवेशनात पारित करुन त्याची तातडीने अमलबजावणी करावी, अशा मुख्य दोन मागण्या आमदार सत्यजीत तांबेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राहुरीतील वकील दाम्पत्य ॲड. राजाराम जयवंत आढाव व त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून हे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य आहे. याविरोधात वकील संघटनांनी राज्यभर आंदोलने सुरू केली आहेत. या हत्याकांडामुळे राज्यभरात खळबळ माजली आहे. वकील वर्गात तर या घटनेमुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जयहिंद लोकचळवळ ही संघटना देखील विधी व न्याय क्षेत्रात राज्यभर कार्यरत आहे. राज्यातील वकिलांच्या प्रश्नांबाबत तसेच विधी व न्याय विभागाशी संबंधित समस्यांवर जयहिंद अतिशय सक्रियेतेने काम करीत असते, अशी माहिती आमदार सत्यजीत तांबेंनी दिली.

ही घटना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. यापूर्वी डॉक्टर बांधवांवरही अशाच प्रकारचे हल्ले होत होते. त्याबाबत माजी आमदार डॉ. सुधीर तांबेंनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर २०१० मध्ये महाराष्ट्र मेडिकेअर प्रिव्हेंन्शन ऑफ व्हायलन्स ॲक्ट हा प्रतिबंधात्मक कायदा करण्यात आला. त्यामुळे डॉक्टरांप्रमाणेच वकीलांवरही होणारे हे जीवघेणे हल्ले थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा करणे गरजेचे आहे. त्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲडव्होकेट्स वेल्फेअर ॲक्ट या कायद्याचा मसुदा तयार असून महाराष्ट्र शासनाकडून तो अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे तो तातडीने मंजूर करणे गरजेचे आहे. तसेच आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणे गरजेचे आहे, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
………………………………….