कु. वैष्णवी चोपडा (जैन) हिच्या आठ उपवासाची सांगता
दिनांक २१ ऑगस्ट २०२५ गुरुवार पासून श्र्वेतांबर आणि स्थानकवासी जैन बांधवांचे पर्व सुरु झाले असून भारतीय संस्कृतीत हा त्यागाचा महिमा आहे. आजच्या युगात मानवा, मानवातील स्नेहाची आपुलकीची दरी रुंदावत चालली आहे. भौतिक प्रगतीच्या शिखराकडे जात असताना आपण वैचारिक भावनिक नाती तर तोडून टाकत नाही ना ? हा प्रश्न निर्माण होतो म्हणून ही नाती तोडली जाऊ नयेत म्हणूनच जैन धर्म ग्रंथामध्ये दहा विषयांवर आचार्यांनी लक्ष वेधले आहे. हे दहा विचार म्हणजेच दशलक्षणादी धर्म होय.
धार्मिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून जनमनाला प्रबोधन करण्याकरिता पर्युषण पर्व असते. आपली ही भूमी विविध धर्माची जननी आहे व धार्मिक अनुष्ठानासाठी प्रसिद्ध असून प्रत्येक धर्माचा पुर्वकाल निश्चित आहे. आपल्याला पर्वकाळात ते आपल्या इष्ट देवतांची आराधना, पूजा विशेष रुपाने करतात. हे करत असताना बहुतेक धर्मात उत्तम कपडे घालणे, मिष्टान्न खाणे, मौज मजा करणे आदि इंद्रियांचे पोषण करणाऱ्या क्रियेने पर्वाचे समापन केले जाते.
असेच जैन धर्मात जेवढे पर्व आहेत हे सगळे पर्व त्याग, वैराग्य आणि संयम याची पुष्टी करणारे व अहिंसा, दया इत्यादी आत्मगुणांचे पोषण करणारे आहेत. या पावन, पवित्र पर्वाचे औचित्य साधून पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील रहिवासी दिलीप चोपडा (जैन) यांची सुकन्या कु. वैष्णवी चोपडा (जैन) हिने दिनांक २० ऑगस्ट २०२५ बुधवारपासून अन्नत्याग करत उपवासाला सुरुवात केली असून दिनांक २७ ऑगस्ट २०२५ बुधवार रोजी पाचोरा येथील जैन स्थानकांमध्ये सांगता करण्यात येणार आहे.