विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून स्वतःला सिद्ध करावे – नानासाहेब संजय वाघ
दि.५ ऑगस्ट २०२५ पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित *तयारी स्पर्धा परीक्षांची* या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना नानासाहेब संजय वाघ म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःतील क्षमता ओळखून स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. करिअरच्या अनेक संधी असून त्या आपल्याला शोधता आल्या पाहिजे. याबरोबरच डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक किंवा अन्य ठिकाणी नोकरी लागल्यानंतर न थांबता आपल्याकडील ज्ञान समाजाला कसे उपयोगी होईल व समाजाच्या तळागाळातील विद्यार्थी हा राष्ट्र हिताच्या दृष्टीने देश सेवेसाठी सहभागी झाला पाहिजे व आपल्या गावाची आपल्या परिवाराची प्रगती त्याच्याकडून झाली पाहिजे यासाठीचे प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजे यासाठी संस्था व महाविद्यालय परिवार विद्यार्थ्यांच्या नेहमी पाठीशी असून कुठलेही अडचण विद्यार्थ्याला येणार नाही त्यासाठीचे सर्व सहकार्य करण्यासाठी संस्थेची तयारी असते असेही मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र चिंचोले होते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यूपीएससी व एमपीएससी द्वारे भरली जाणारी पदे त्यासाठीच्या विविध परीक्षा यांची माहिती नसते म्हणून विद्यार्थ्यांनी ती माहिती करून घेतली पाहिजे व आपल्यातील गुण ओळखून आपण कोणत्या क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करू शकतो व करिअर निवडू शकतो यासाठी चे मार्गदर्शन केले.आपली आर्थिक परिस्थिती, शारीरिक अपंगत्व आपल्या यशाच्या आड येणार नाही असेही त्यांनी सांगितले यासाठी त्यांनी विविध यशस्वी विद्यार्थ्यांची उदाहरणे दिली त्यामध्ये दीपक कुमार हा दिल्लीत चहाच्या टपरीवर काम करणारा विद्यार्थी आयएएस झाला, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील ताडेबामणे या गावचे राजेश पाटील एकेकाळी पाव विकणारा हा विद्यार्थी आयएएस होऊन देश सेवा करत आहे. कमलेश पारेख रमेश घोलप,अन्सार शेख यासारख्या आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयएएस परीक्षा कशा पद्धतीने पास केली याची त्यांनी उदाहरणे दिली. याबरोबरच अरुणीमा सिन्हा या विद्यार्थिनीची रेल्वे अपघातात आपला पाय गमावला असताना देखील शारिरीक अपंगत्वाचा विचार न करता या अपंग विद्यार्थिनीने जगातील सर्वोच्च शिखरे चढून पार केली व माऊंट एव्हरेस्ट सारख्या शिखरावर भारताचा झेंडा रोवला आणि देशांमध्ये व जगात कीर्ती स्थापन केली अशी उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम प्रा.राजेंद्र चिंचोली यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ होते व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही.टी जोशी संचालक आप्पासाहेब सतीश चौधरी, माजी प्राचार्य डॉ. बी एन पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पाटील उपप्राचार्य डॉ.वासुदेव वले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष प्रा. सी.एन चौधरी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ जे डी गोपाळ यांनी केले तर आभार अँडव्होकेट महेश पवार यांनी मानले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.