“पर्यावरण दिनी समर्पण फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम” रोप देऊन नवीन पोलिस निरीक्षकांचे स्वागत; पोलिस स्टेशन परिसरात वृक्षारोपण

सोयगाव, दत्तात्रय काटोले
सोयगाव, दि. ५ (प्रतिनिधी) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समर्पण फाऊंडेशनच्या वतीने सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. फुलांच्या गुच्छाऐवजी रोप भेट देऊन नवीन प्रभारी पोलिस अधिकारी यांचे स्वागत करण्यात आले, तसेच पोलिस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.
सोयगाव पोलिस ठाण्याचे नवीन प्रभारी अधिकारी दिनकर शिवाजीराव गोरे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल समर्पण फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. स्वागतासाठी फुलांऐवजी ज्ञान, संस्कार आणि निसर्गाचे प्रतीक असलेले रोप भेट देऊन पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला. यावेळी गोरे यांना त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून समर्पण फाऊंडेशन व सोयगाव पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि फाऊंडेशनचे सदस्य यांनी उत्साहाने सहभाग घेत कडुलिंब व चिंचेची रोपे लावली. वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. “सेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
फोटो ओळ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोयगाव पोलिस स्टेशन परिसरात समर्पण फाऊंडेशन व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करताना नवीन प्रभारी अधिकारी दिनकर शिवाजीराव गोरे, पोलिस कर्मचारी व फाऊंडेशनचे पदाधिकारी.
फोटो, दत्तात्रय काटोले.

























