Home महाराष्ट्र नेवासा तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ,भेंडा येथे सेवानिवृत्त नायब तहसिल दाराच्या घरावर दरोडा, 8...

नेवासा तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ,भेंडा येथे सेवानिवृत्त नायब तहसिल दाराच्या घरावर दरोडा, 8 तोळे सोने,किंमती मोबाईल सह 31 हजारांची रोकड लंपास?

नेवासा तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ,भेंडा येथे सेवानिवृत्त नायब तहसिल दाराच्या घरावर दरोडा, 8 तोळे सोने,किंमती मोबाईल सह 31 हजारांची रोकड लंपास

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

संपूर्ण राज्यभर गुंडांचा हैदोस सुरू असुन त्याची पाळेमुळे अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील अनेक गावांत रुजलेली आहेत. त्याचे भयानक परिणाम आता दिसू लागले आहेत.

या बाबतची घटना अशी की नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार मच्छिंद्र यशवंत बर्डे यांच्या भेंडा-तरवडी रस्त्यावर असलेल्या वस्तीवर मंगळवार दि.10 फेब्रुवारी रोजी पहाटे काही अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून 31 हजार 200 रुपयांची रोख रक्कम व ( 7 तोळे 9 ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत सौ.जयश्री दौलत बर्डे (वय वर्षे 33), राहणार ,बर्डे वस्ती,भेंडा बुद्रूक शिवार, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर यांनी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, दिनांक 9 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आमच्या कुटुंबातील आम्ही सर्व जण जेवण करुन मी माझे पती व मुलगी माझ्या बेडरुम मध्ये झोपलो होतो. 10 फेब्रुवारी रोजी रात्री अंदाजे 2 वाजण्याच्या सुमारास माझ्या सासू विमलबाई बर्डे यांचा आरडा-ओरडा झाल्याचा आवाज आम्हाला ऐकू आला होता. सासू मोठ्याने ओरडत होत्या की घरात कोणीतरी चोरटे घुसले आहेत. तेव्हा माझे पती यांनी सासु-सासरे यांच्या रुममध्ये जावून पाहीले असता कोणीतरी अज्ञात व्यक्ती बाहेरुन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. मग माझ्या पतींनी सासू-सासरे यांना आमच्या बेडरुम मध्ये आणले व आमच्या घरात परवाना असलेल्या रायफलचा धाक दाखवत घरात घुसलेल्या दरोडेखोरांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.परंतु दांडगाई करून घरात अचानक 4 ते 5 दरोडेखोर घुसले होते.त्यापैकी एकाने त्याच्या हातातील पिस्तूल सदृष्य वस्तूने माझ्या पतींना धाक दाखवून माझ्या पतीच्या हातातील रायफल हिसकावून घेतली होती व त्यांच्यापैकी एका दरोडेखोरांने त्याच्या हातातील चाकूने माझ्या पतीच्या डोक्यात मागच्या बाजुने आणि डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर वार करून जोरदार मारहाण केली.त्यानंतर ते सर्व 5 दरोडेखोर इसम आमच्या बेडरुमध्ये आले होते.त्यापैकी एका दरोडेखोरांने त्याच्या हातातील चाकू दाखवून आम्हाला शांत राहण्यासाठी धाक दाखवला होता. त्या दरोडेखोरा पैकी तिघांनी माझ्या पतीचे हात-पाय बांधून त्यांना बेडवर झोपवले आणि माझे सासरे व मुलगी यांना देखील बेडच्या एका बाजुला बसवले आणि सासू यांना बेडच्या खाली बसविले होते. त्यापैकी एकाने मला चाकूचा धाक दाखवून घरातील कपाटाच्या चाव्या मागितल्याने मी घाबरुन त्या घरातील कपाटाच्या सर्व चाव्या त्यांना दिल्या. त्यांनी कपाटाच्या चाव्या मिळाल्यावर आमच्या घरातील बेडरुम मधील सर्व कपाटे उघडून सोन्याचे दागीने व काही रोख रक्कम काढुन घेतली. त्यानंतर सासू विमलबाई यांच्या रुम मधीलही कपाटाच्या चाव्या घेवून त्यांच्या रुम मधील सर्व कपाटे उघडून त्यातील सर्व सोन्याचे दागीने व रोख रक्कम काढुन घेतली.घरात घुसलेल्या दरोडेखोरा पैकी काही जण हे हिंदी भाषेत तर काही जण हे मराठी भाषेत बोलत होते. त्यानंतर शेवटी त्यांनी पुन्हा मला चाकूचा धाक दाखवून अजुन कुठे काही लपून ठेवले आहे का? असे विचारले असता मी त्यांना नाही म्हणाले मग त्यांनी आमचे सर्वांचे मोबाईल आमच्या कडून हिसकावून घेतले. व घरातुन काढून घेतलेले सर्व दागीने एका टॉवेल मध्ये गुंडाळून माझ्या पतीच्या बॅगामध्ये भरले.व घरातील रायफल सोबत घेवून घराचे सर्व दरवाजे बाहेरुन बंद करुन सुमारे 3 वाजन्याच्या सुमारास ते सर्व दरोडेखोर घरातून निघून गेले.या आशयाच्या फिर्यादी वरून नेवासा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेचे कलम 310(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेवासा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार हे पुढील तपास करीत आहेत.

दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत यशवंत बर्डे यांच्या हाताला,गणेश बर्डे याच्या हात, कपाळ व डोळ्याला जबर मार लागून मोठ्या जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते.त्यांनी तातडीने फॉरेन्सिक लॅबची टीम व श्वान पथकला घटनास्थळी पाचारण केले होते.श्वान पथकाने चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू साहेब आणि जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने ही तात्काळ घटनास्थळी भेट दिली होती.

नेवासा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनीही तातडीने घटनास्थळी भेट देऊन बर्डे कुटुंबियांची विचारपूस करून सांत्वन केले होते.आणि तातडीने या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करून या चोरीचा वेगाने व सखोल तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचनाही पोलीसांना दिल्या आहेत.चोरीस गेलेला मुद्देमाल असा होता की

4 ग्रॅम वजनाचा सोन्याचा पिळा, 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण,5 ग्रॅम वजनाची सोन्याची मंचली,5 ग्रॅम वजनाचा सोन्याचा पिळा, (25 हजार रुपये), 5 ग्रम वजनाची सोन्याची अंगठी (25 हजार रुपये),12.5 ग्रॅम सोन्याची कर्णफूले, 2.50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल,8 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र,2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील कर्णफुले,सासरे मच्छिंद्र बर्डे यांचा 10 हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, 31 हजार 200 रुपये रोख रक्कमे सह पतीच्या पाकिटातील आधार कार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे असा सर्व ऐवज चोरीला गेला आहे.रायफल मात्र शेजारच्या उसात मिळाली आहे.

गणेश बर्डे याने घरातील रायफल काढून दरोडेखोरांना धाक दाखविण्याचा प्रयत्न केला होता.पण उलट दरोडेखोरांंनी गणेशच्या कपाळावर टणक वस्तूने मार देऊन त्याच्या कडून रायफल हिसकावून घेतली होती. हातातील धारदार हत्यारे व गावठी कट्टयांचा धाक दाखवून दरोडेखोरांनी घरातील सर्व दाग दागिने सोने चोरून नेले होते. जाताना बर्डे यांची परवाना असलेली रायफल घेऊन गेले होते मात्र, सकाळी घराशेजारील उसात ती रायफल आढळून आली होती.अशा प्रकारे दरोडेखोरांनी निवृत्त तहसीलदार यांच्या घरावर दरोडा टाकून दहशत निर्माण करून ऐवज लंपास केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी तातडीने या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळन्याच्या सुचना नेवासा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्या आहेत.यामुळे संपूर्ण नेवासा तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Don`t copy text!