Home महाराष्ट्र पारध येथील शेत पाणंद रस्त्यांच्या कामाला सुरूवात 

पारध येथील शेत पाणंद रस्त्यांच्या कामाला सुरूवात 

पारध येथील शेत पाणंद रस्त्यांच्या कामाला सुरूवात आ. संतोषभाऊ दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली 9 किलोमीटर शेत पानंद रस्त्यांच्या कामास वेग

 

 

पारध/ महेंद्र बेराड– भोकरदन तालुक्यातील पारध–पिंपळगाव रेणुकाई शेत शिवारातील शेत पाणंद रस्त्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. रस्त्याअभावी शेतकऱ्यांना शेतात जाणे, शेतीमालाची वाहतूक करणे तसेच पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर या प्रश्नाला न्याय मिळत असून पारध परिसरात शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. जवळपास ९ किलोमीटरचे रस्ते सध्या प्रगतिपथावर असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बऱ्याच दिवसापासून पारध येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड यांनी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला. विविध वर्तमानपत्रांमधून बातम्या प्रकाशित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली, जनजागृती केली तसेच शासन दरबारी हा प्रश्न सातत्याने मांडला. “शेत पाणंद रस्त्यांचा प्रश्न गंभीर असून प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा मोठे आक्रमक आंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला होता. दैनिक कार्यसत्कार मध्ये “शेत पाणंद रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा – महेंद्र बेराड आक्रमक” ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली. त्यानंतर संबंधित विभागाने पाहणी करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली राजर्षी शाहू कॉलेज ते चौरी वाडी मार्गावरील पाणंद रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच स्मशानभूमी ते चौरीवाडी आणि राजर्षी शाहू कॉलेज ते या शेत पानंद रस्त्यांची कामे पूर्णत्वास गेली आहे. या रस्त्यांमुळे ट्रॅक्टर, शेतीची अवजारे तसेच मालवाहतूक करणारी वाहने थेट शेतापर्यंत पोहोचू शकणार आहेत. मिरची,भाजीपाला, फळबाग व इतर शेतीमाल बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राजर्षी शाहू कॉलेज ते चौरीवाडी या नवीन शेत पाणंद रस्त्याचे काल उद्घाटन झाले. यावेळी शेत पाणंद रस्ता समिती सदस्य तथा माजी जि.प.सदस्य सुभाष भाऊ देशमुख, माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर पाटील लोखंडे, माजी सरपंच गणेश पाटील लोखंडे, रामेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक संजय पाटील लोखंडे,शिवा पाटील लोखंडे,सांडू लोखंडे, गंगाराम तेलंग्रे, संपत काटोले, गणेश तेलंग्रे, गंजीधर लोखंडे, राजू भानुसे, महेंद्र बेराड, भगवान तेलंग्रे,पवन बेराड, अशोक लोखंडे,सुनील बेराड, विजय सुरडकर,दत्ता लोखंडे, पंजाब देशमुख, विजय सोनूने, अरुण काटोले, शेख असलम यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी आमदार संतोष दानवे यांचे आभार मानले. सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मे आणि जून २०२६ या दोन्ही महिन्यांमध्ये पारध परिसरात शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली असून जवळपास नऊ किलोमीटरचे रस्ते होत आहेत, याचा मनस्वी आनंद आहे. अशाच प्रकारचे शेत पानंद रस्ते हे संपूर्ण पारध पिंपळगाव रेणुकाई सर्कल मध्ये व्हायला पाहिजे. शेत पाणंद रस्ते ग्रामीण शेतकऱ्यांसाठी विकासाची नवी वाट ठरणार आहेत. तसेच शेत पानंद रस्त्याचे काम दर्जेदार, टिकाऊ आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण व्हावीत, हीच सर्वसामान्य शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे.”

Don`t copy text!