Home महाराष्ट्र कृषि सेवा केंद्र चालकांनी मांडल्या व्यवसायाच्या व्यथा

कृषि सेवा केंद्र चालकांनी मांडल्या व्यवसायाच्या व्यथा

कृषि सेवा केंद्र चालकांनी मांडल्या व्यवसायाच्या व्यथा

 

 

 

सोयगाव, दि. २६ (प्रतिनिधी ) तालुक्यातील कृषि सेवा केंद्र चालकांच्या विविध अडचणी व खत पुरवठ्याच्या समस्यांबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेला सावळदबारा ते गोंदेगाव परिसरातील ५१ कृषि सेवा केंद्र चालक उपस्थित होते.

 

सभेच्या प्रारंभी कृषि अधिकारी रमेश गुंडीले यांनी दुकानदारांनी दुकानात कोणकोणती दप्तरे व नोंदी जतन कराव्यात, याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी प्रास्ताविकात कृषि सेवा केंद्र हे केवळ विक्री केंद्र न राहता शेतकऱ्यांसाठी सुविधा केंद्र म्हणून कार्यरत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.

 

यावेळी उपस्थित विक्रेत्यांनी खत पुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. कंपनीकडून मागणीनुसार खत उपलब्ध होत नसल्याने व्यवसाय अडचणीत आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हाबंदीमुळे इतर जिल्ह्यांतून खत आणण्यास अडचणी निर्माण होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.

 

दुकानदारांनी चाळीसगाव, पाचोरा, जळगाव किंवा मलकापूर येथे रॅक पॉईंट सुरू करण्याची मागणी केली. सोयगाव तालुक्याला मागणीप्रमाणे खत मिळत नसल्याने दिवसेंदिवस व्यवसाय करणे कठीण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

सभेच्या शेवटी तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी उपस्थितांनी मांडलेल्या सर्व अडचणी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येतील, असे आश्वासन दिले. सभेचे सूत्रसंचालन सहायक कृषि अधिकारी मयुर बारी यांनी केले.

Don`t copy text!