सोयगावात प्रथमच पंचमुखी हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा; पंचकुंडात्मक रुद्रायागाचे आयोजन
दत्तात्रय काटोले
सोयगाव (प्रतिनिधी) – सोयगाव शहरात व परिसरात प्रथमच पंचमुखी हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व पंचकुंडात्मक रुद्रायाग सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून, दि. २४ मार्च ते २७ मार्च २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सोहळ्याची सुरुवात मंगळवार, दि. २४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मूर्तीची नगर प्रदक्षिणा व शोभायात्रेने होणार असून सायंकाळी ४ वाजता प्रायश्चित संकल्प, गोपुजन व विष्णुपूजन होईल. बुधवारी सकाळी ९ वाजता गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, कुंडपूजन, मंडपपूजन तसेच विविध देवतांची स्थापना करण्यात येणार आहे. यानंतर मूर्तीचा जलाधिवास, सहाय्यपूजा, आरती व नैवेद्य होईल.
गुरुवार, दि. २६ मार्च रोजी प्रांतपूजन, हवन, मूर्ती न्यास स्थापना, धान्याधिवास व शय्यानिवास असे विधी पार पडतील. शुक्रवारी, दि. २७ मार्च रोजी मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा, कलशारोहण, विश्वशांती पूर्णाहुती, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसाद दुपारी १२ वाजता ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत जाहीर कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कीर्तनासाठी ह.भ.प. विक्रम महाराज झाल्टे, ह.भ.प. अजबराव महाराज मिसळे, ह.भ.प. लहान महाराज पाटील तसेच ह.भ.प. राजेंद्र महाराज साबळे यांची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यासाठी श्री महामुनी अगस्ति महाराज वारकरी शिक्षण संस्था, सोयगाव तालुका वारकरी मंडळ तसेच विविध भजनी मंडळे व धार्मिक संस्थांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या धार्मिक सोहळ्यामुळे सोयगाव परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















