सोयगावात खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत शेतकरी हिताचे निर्देश

सोयगाव, दत्तात्रय काटोले
सोयगाव (प्रतिनिधी) दि. २ — आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. येथील पंचायत समितीच्या बचत भवनात त्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन व आढावा बैठक पार पडली.
बैठकीत बोलताना सत्तार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करणे अत्यावश्यक आहे. बाजारात चढ्या दराने खत व बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर तसेच बोगस साहित्य विकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके स्थापन करून कडक कारवाई करावी. पात्र शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देत कोणत्याही प्रकारची अडवणूक किंवा पिळवणूक होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या व शासकीय मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळावे, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना’ अंतर्गत कामे गतीने पूर्ण करावीत, तसेच पाणीटंचाई निवारणासाठी निविदा प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून आवश्यक त्या ठिकाणी विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, असे त्यांनी सांगितले.
कृषी विभागाने नॅनो युरियाच्या वापरावर भर देत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊन कमी खर्चिक शेती पद्धतींचा प्रसार करावा. कृषी सहाय्यकांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत शासनाच्या योजनांची माहिती द्यावी, असेही सत्तार यांनी निर्देशित केले.
मनरेगा योजनेला प्राधान्य देत ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती वाढवावी. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ अभियानासाठी कृती आराखडा तयार करून येत्या दहा दिवसांत कामांना सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले.
बैठकीदरम्यान पाणीपुरवठा विभागाचा मुद्दा विशेष गाजला. सावळदबारा कवली, निमखेडी, फर्दापूर-तांडा व ठाणा येथील ग्रामस्थांनी प्रलंबित पाणीपुरवठा कामांबाबत तक्रारी मांडल्या. यावर सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत कामे तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो, दत्तात्रय काटोले























