एस.आर.टी. शेती शाळा सोयगाव येथे उत्साहात संपन्न

दत्तात्रय काटोले
सोयगाव प्रतिनिधी – सोयगाव येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली एस.आर.टी. शेती शाळा उत्साहात पार पडली. या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शेती शाळेचे मार्गदर्शन जळगाव जिल्ह्याचे एस.आर.टी. प्रचारक राहुल भाऊ पाटील व परशुराम भाऊ देवरे यांनी केले. त्यांनी एस.आर.टी. शेती पद्धतीचे महत्त्व, मातीची सुपीकता वाढविण्याचे उपाय, कमी खर्चातील शेती, सेंद्रिय कर्ब वाढ आणि शाश्वत शेती याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रात्यक्षिकातून त्यांनी मक्का व कापूस पिकासाठी एस.आर.टी. तंत्रज्ञानाचा वापर करून एका एकरात १६ क्विंटल उत्पादन घेण्याचा यशस्वी अनुभव सांगितला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये या पद्धतीबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली.
कृषीभूषण अरुण सोहणी यांनी या पद्धतीचे कौतुक करत, यामुळे तरुण वर्ग शेतीकडे आकर्षित होईल व उत्पादनक्षमता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच प्रदीप चौधरी यांनी एस.आर.टी. शेतीची सविस्तर माहिती देत, ही पद्धत शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे स्पष्ट केले. “जमीन जिवंत ठेवायची असेल तर एस.आर.टी. स्वीकारणे गरजेचे आहे,” असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमात खर्च कमी करणे, उत्पादन वाढवणे, जमिनीचा पोत सुधारणे आणि नैसर्गिक शेतीकडे वाटचाल या एस.आर.टी. पद्धतीच्या फायद्यांवर विशेष चर्चा झाली. शेतकऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
या वेळी भास्कर चौधरी सर यांनी जलतारा प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रघुनाथ काटोले सर यांनी केले.
या शेती शाळेमुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाविषयी जागरूकता वाढून शेतीत सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
























