पाचोरा येथे शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
पाचोरा : शिंदे इंटरनॅशनल स्कूल CBSE पाचोरा येथे दि. २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महान शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी अॅड. जे. डी. काटकर, उपाध्यक्ष निरज मुनोत, सहसचिव डॉ. शिवाजी शिंदे, डायरेक्टर अमोलभाऊ शिंदे, सौ. पूजा ताई शिंदे तसेच प्राचार्य डॉ. विजय पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना ‘रमण इफेक्ट’चे प्रात्यक्षिक सादर करून त्याचे दैनंदिन जीवनातील विविध उपयोग सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी उत्सुकता व जिज्ञासा अधिक वाढली.
शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक विषयांवर आधारित मॉडेल्स व प्रयोग सादर केले. पर्यावरण संरक्षण, ऊर्जा संवर्धन, सौरऊर्जा, जलशुद्धीकरण, अवकाश संशोधन आदी विषयांवरील प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मान्यवरांनी प्रत्येक विद्यार्थ्याजवळ जाऊन त्यांच्या प्रयोगांची बारकाईने पाहणी केली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडून त्यांना गौरविण्यात आले.
अशा प्रकारे ज्ञानवर्धक व प्रेरणादायी वातावरणात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.























