
( दत्तात्रय काटोले )सोयगाव छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण), दि. 03 जानेवारी :पोलीस स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर दि. 02 ते 08 जानेवारी 2026 या कालावधीत पोलीस रेजिंग डे सप्ताह–2026 साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण व प्रात्यक्षिक स्वरूपाचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमांतर्गत चैतन्य टेक्नो स्कूलच्या 120 विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह पोलीस मुख्यालयास शैक्षणिक भेट दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह व पोलीस उपाधीक्षक (गृह) गौतम पथारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून पोलीस दलाचे कार्य, जबाबदाऱ्या, शिस्तबद्ध रचना तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांना शस्त्र विभाग, डॉग स्क्वॉडचे प्रात्यक्षिक, फॉरेन्सिक व्हॅन, अंगुलीमुद्रा तज्ज्ञांचे कार्य, दंगा नियंत्रण वाहनांचे सादरीकरण दाखविण्यात आले. यासोबतच डायल–112 सेवेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, सायबर गुन्हे व ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव, वाहतूक नियम, तसेच महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी भरोसा सेलच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस मुख्यालयातील गोकुळ मैदान येथे उभारण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक शस्त्रसाठा, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक, दामिनी पथक, महिला व बालकांविषयीचे कायदे आणि ‘पोलीस काका–पोलीस दीदी’ उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
हे प्रदर्शन रविवार वगळता दि. 08 जानेवारी 2026 पर्यंत नागरिकांसाठी खुले असून, विद्यार्थी व नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हा उपक्रम पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या संकल्पनेतून साकारला असून, त्याचे नियोजन व अंमलबजावणी पोलीस उपाधीक्षक गौतम पथारे, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व राखीव पोलीस निरीक्षक अण्णासाहेब वाघमोडे यांनी केली.






















