छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून संविधान दिन साजरा — रक्तदानातून २६/११ शहीदांना अभिवादन;
१६३ जणांचे रक्तदान, ३७७ नागरिकांची नेत्र तपासणी
दत्तात्रय काटोले, सोयगाव
सोयगाव प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण | दि. 26 नोव्हेंबर 2025
छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने संविधान दिन उत्साहात, शिस्तबद्ध आणि समाजाभिमुख वातावरणात साजरा करण्यात आला. कैलास शिल्प सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. विरेंद्र मिश्रा (भा.पो.से.) आणि पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड (भा.पो.से.) यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संविधान हा लोकशाहीचा आत्मा असल्याचे सांगत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना कृतीत उतरवण्याचे आवाहन केले.
२६/११ शहीदांना रक्तदानातून अभिवादन
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या शिबिराला नागरिक, विद्यार्थी आणि पोलीस दलाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १६३ रक्तदात्यांनी रक्तदान करून शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मोफत नेत्र तपासणी — ३७७ नागरिकांची तपासणी
समता फाउंडेशन आणि लायन्स क्लब यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिरही घेण्यात आले. यात ३७७ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून
१८० जणांना चष्म्याची आवश्यकता असल्याचे निदान
१६ नागरिकांमध्ये मोतीबिंदू आढळून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन
या मोफत वैद्यकीय सेवेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
सुव्यवस्थित आयोजनासाठी पोलिसांचा समन्वय
कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, रा. पो. नि. अण्णासाहेब वाघमोडे तसेच वेल्फेअर शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी प्रभावीपणे सांभाळली.
संविधानातील मूल्यांची पुनर्स्मृती, शहीदांच्या त्यागाचे स्मरण आणि समाजाभिमुख सेवेला नवा वेग देणारा असा हा उपक्रम ठरला.

























