जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक संपन्न कोरोना लसीकरणाचा घेतला आढावा

जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक संपन्न
कोरोना लसीकरणाचा घेतला आढावा

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 26 – कोविड-19 लसीकरणातील अडचणी व उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस आयएमएचे सचिव डॉ राधेशाम चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ रावलाणी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अकलाडे आदि उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यासाठी कोरोना लसीची उपलब्धता, वितरण व केंद्रांची संख्या, लस उपलब्धता होण्यासाठी करावयाचे प्रयत्न, जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरीक, कोमॉर्बिड व्यक्तींची संख्या, त्यांचे झालेले लसीकरण, उर्वरित व्यक्तींचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी करावयाची जनजागृती, लसीकरण केंद्रावर यंत्रणेला येणाऱ्या अडचणी, नागरीकांच्या अडचणी, शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार लसीकरणासाठी करावयाची नोंदणी आदिंबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी दिल्यात. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे, त्यासाठी आवश्यक असलेल्या तपासणी किटची उपलब्धता यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी येत्या 28 एप्रिलपासून जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या तपासणी मोहिमेच्या पूर्वतयारीचाही आढावा घेण्यात आला. या मोहिमेत नागरीकांचे सर्वेक्षण करतांना यंत्रणेने आवश्यक ती काळजी घेऊन कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. वेळेत निदान, वेळेत उपचार या तत्वानुसार सर्वेक्षणावर भर देण्यात यावा.
येत्या 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त होताच करावयाची कार्यवाहीबाबत यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिले. यावेळी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विविध विषयांवर उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करुन जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरच कमी करण्यात यंत्रणांना यश येईल असे सांगून नागरीकांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.