पाथर्डी नगर पालीका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळी बाभुळगावात सुखदेव तिजोरे च्या हातभट्टीवर पोलिसांचा छापा,
२२००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट,महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल,आरोपी पोलिसांच्या ताब्यात
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात नगर पालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा धुराळा उडायला सुरूवात झाली आहे.निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे नगर पालीका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरालगत असलेल्या माळी बाभुळगाव येथे सुखदेव तिजोरे याच्या हातभट्टी वर पोलीसांच्या छाप्यात एकुण २२,००० रुपये किंमतीची हातभट्टीची गावठी दारू आणि कच्चे रसायन मिळून आले आहे.सदर हातभट्टीची गावठी दारू आणि कच्चे रसायन पोलीसांनी जागेवरच ओतून देऊन नष्ट केले आहे. या बाबतची माहिती अशी की दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाथर्डीतील पोलीसांना माळी बाभुळगाव, तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर येथील सुखदेव धोंडीराम तिजोरे वय (वर्षे ५४) हा इसम त्याच्या राहत्या घराच्या आडोश्याला विनापरवाना हातभट्टीची गावठी दारू तयार करून चोरून विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पाथर्डी पोलीसांनी तेथे जाऊन छापा टाकला असता एका पांढऱ्या रंगाच्या ड्रममध्ये हातभट्टीची तयार केलेली २० लिटर दारू मिळून आली.तसेच घराच्या आडोश्याला भिंती लगत जमिनी मध्ये दोन फूट खोल दोन २०० लिटरचे बॅरल मिळून आले.त्यामध्ये एकूण ४०० लिटर रसायन आणि गावठी दारू तयार करण्याची साधने मिळून आली.तो सर्व मुद्देमाल पोलीसांनी जागेवरच ओतून देऊन नष्ट केला आहे. तसेच हातभट्टीची दारू तयार करण्याची साधनेही जागीच नष्ट केली आहे.पोलीसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये एकुण २० लिटर गावठी दारू अंदाजे किंमत २००० रुपये, ४०० लिटर हातभट्टीची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन २०,००० रुपये,असा एकूण २२००० रुपये किंमतीचा मुद्देमाल सुखदेव तिजोरे याच्या ताब्यात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याला पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये आणून त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमा अंतर्गत कलम ६५(फ),(क),(ड),(ई) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब,शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू साहेब,पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब, यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस सब इन्स्पेक्टर विलास जाधव, पोलिस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर ईलग, पोलिस कॉन्स्टेबल इजाज सय्यद यांच्या पथकाने केली आहे.मागिल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नगर जिल्ह्यातील पांगरमल येथे विषारी दारूमुळे अनेकांचे बळी गेले होते.ती केस अजूनही न्यायालयात सुरू आहे.तेव्हापासुन आपल्या हद्दीत गावठी दारू तयार करू न देण्याच्या सूचना प्रत्येक पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांना देण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीच्या काळात सर्वच ठिकाणी वारेमाप दारूचा आस्वाद घेतला जातो.आणि त्यातच राजकीय वैमनस्यातून विषारी दारू पाजण्याचा प्रयोग केला जातो. असले गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिस डोळ्यात तेल घालून पहारा देत असतानाही पोलीसांच्या डोळ्यात धुळफेक करीत गावठी दारू तयार करून त्याची परस्पर विक्री करण्याची शक्कल तिजोरे कडून लढवली जात होती.परंतू पाथर्डी तालुक्यातील पोलिसांनी हा डाव हाणून पाडला आहे.

























